हिंदू राष्ट्राच्या इस्लामीकरणाचा डाव खपवून घेणार नाही – नितेश राणेंचा इशारा!

हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन; संजय राऊतांवरही तोफ डागली

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांनी आधी नाक घासून माफी मागावी

सिंधुदुर्ग : जगभरात सुरू असलेल्या इस्लामीकरणाच्या प्रक्रियेबाबत हिंदू समाजाने आता गाफील राहून चालणार नाही. कोणत्याही मार्गाने धर्मांतराचे प्रयत्न होत असतील, तर त्याला वेळीच विरोध करण्यासाठी हिंदू समाजाने सतर्क राहिले पाहिजे. आपला देश हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्राला इस्लामीकरणाचे गालबोट लागता कामा नये, असा आक्रमक इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला. ओरोस येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका ठामपणे मांडली.

जगभरातील विविध देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि बदलती परिस्थिती पाहता इस्लामीकरणाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. अनेक देशांनी या विषयाची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातील हिंदू समाजानेही सावध राहून आपल्या संस्कृतीचे आणि देशाच्या हिंदू अस्मितेचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणाऱ्या राऊतांना राणेंचा थेट सवाल!शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेबाबत घडलेल्या प्रकरणावर माफी मागितल्यानंतर संजय राऊत यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. संबंधितांनी माफी मागितली आहे. कोणताही कडवट शिवसैनिक बाळासाहेबांचा असा अवमान मुद्दाम करणार नाही, असे सांगतानाच राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या उबाठा पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेल्या प्रतारणेबद्दल आधी माफी मागावी. ती ३०० ते ५०० दिवस नव्हे, तर नाक घासून मागितली पाहिजे, अशा तिखट शब्दांत राणेंनी राऊतांना लक्ष्य केले.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे ‘हिंदूहृदयसम्राट’ हा शब्द लिहिण्याचीही या मंडळींना भीती वाटत होती. बाळासाहेबांच्या विचारांना बदनाम करण्याचे आणि त्यांच्या विचारांच्या विरोधात वागण्याचे काम कोणी केले, याचे उत्तर आधी संजय राजाराम राऊत यांनी द्यावे. दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा हिशेब द्यावा, असे खुले आव्हानही राणे यांनी दिले.

error: Content is protected !!