
मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची नगरपालिकेकडे मागणी
मालवण : मालवण शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपालिकेने मोकाट गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिकेची ही कारवाई स्वागतार्ह असून, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविणे आवश्यक आहे, असे मत मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांनी व्यक्त केले.
नगरपालिकेने आतापर्यंत जवळपास ११ मोकाट गुरे पकडून कोंडवाड्यात ठेवली आहेत. मात्र, या गुरांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आणि घाणीचे साम्राज्य असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या गुरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, नगरपालिकेने मोकाट गुरे पकडण्याबरोबरच त्यांच्या संगोपनाची आणि आरोग्याचीही जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशी मागणी देखील अन्ननसीएशन यांनी केली आहे.

कोंडवाड्यात गुरांसाठी स्वच्छ जागा, पुरेसे पाणी, योग्य खाद्य तसेच आवश्यक स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पकडलेल्या गुरांची नियमित पाहणी करून त्यांची प्रकृती बिघडणार नाही, याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी. मोकाट गुरांवर कारवाई करताना त्यांना सुरक्षित आणि मानवी पद्धतीने ठेवणे हीदेखील प्रशासनाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, पकडण्यात आलेल्या गुरांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. संबंधित मालकांकडून नियमानुसार दंड वसूल करून गुरे त्यांच्या ताब्यात द्यावीत. मात्र, दंड भरून गुरे परत घेतल्यानंतरही संबंधित मालकांनी पुन्हा ती गुरे रस्त्यावर मोकाट सोडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मोकाट गुरांचा प्रश्न केवळ नागरिकांच्या त्रासापुरता मर्यादित नसून तो वाहतूक सुरक्षेशी आणि शहराच्या स्वच्छतेशीही संबंधित आहे. त्यामुळे नगरपालिका, पशुपालक आणि नागरिक यांनी समन्वयाने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नगरपालिकेने सुरू केलेली मोहीम केवळ काही दिवसांपुरती न राहता नियमितपणे सुरू ठेवावी, तसेच कोंडवाड्यातील गुरांच्या देखभालीकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गॅरी अन्ननसीएशन यांनी व्यक्त केली.






Subscribe to my channel






