Malvan | मुख्य बाजारपेठेतील धोकादायक इमारतीला नगरपालिकेकडूनच संरक्षण ; भाडेकरुंकडून बळजबरी कब्जा

जागामालक सदानंद मयेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून लक्ष घालण्याची मागणी

दुर्घटना घडल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची प्रतिक्रिया

मालवण : मालवणच्या मुख्य बाजारपेठेतील सरस्वती सदन ही इमारत गेली चार ते पाच वर्ष धोकादायक स्थितीत असून २०२२ पासून नगरपालिका वारंवार या इमारतीला धोकादायक असल्यामुळे नोटीसा देत आहे. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून आम्ही जागा मालक म्हणून इमारत स्वखर्चाने पाडण्यासाठी तयार आहोत. मात्र काही भाडोत्रीनी येथे बळजबरी कब्जा केला असून नगरपालिकेच्या नोटीसीना केराची टोपली दाखवत इमारतीचा वापर सुरुवात ठेवला आहे. तरी देखील नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या धोकादायक इमारतीला मालवण नगरपालिका संरक्षण देत असल्याचा आरोप करत जागा मालक सदानंद मयेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरुवारी लेखी तक्रार केली आहे. ही इमारत कोसळल्यास मोठी जीवित व वित्तहानी होणार असून नजिकच्या रहिवाश्यांचा जीव देखील धोक्यात येणार आहे. तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मालवण सोमवार पेठ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आमच्या मालकीची घर नं. १८९९ ही इमारत धोकादायक बनली असून या इमारतीचा स्लॅब कोसळू लागला आहे. गेली चार ते पाच वर्ष नगरपालिकेकडून या इमारतीला फक्त नोटीसा काढून इमारतीचा वापर करू नये, अशा सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात येत असून तरी देखील या इमारतीचा वापर सुरु आहे. मात्र याकडे मालवण नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असून या इमारतीमुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत असताना देखील याठिकाणी नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.मागील आठवड्यात मुंबईतील मानखुर्द येथे तीन मजली धोकादायक इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर नगरपालिकेने या इमारतीला पुन्हा एकदा नोटीस बजावत इमारतीचा वापर पांबावावा, असे सूचित केले. मात्र तरीही आज देखील ही इमारत वापरात आहे. त्यामुळे मालवणात मानखुर्द दुर्घटनेची पुनरावृती होण्याची नगरपालिका प्रशासन वाट पाहतेय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

बाजारपेठेतील आमच्या मालकीच्या या इमारतीत पालव टेलर्स हे दुकान आणि वरच्या मजल्यावर तीन भाडेकरू आहेत. ही इमारत धोकादायक असल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मागील चार ते पाच वर्ष नगरपालिकेकडून आम्हाला नोटीस पाठवून या इमारतीचा वापर थांबवण्याच्या सूचना करण्यात येत आहेत, मात्र या ठिकाणी असलेल्या भाडेकरूंकडून नोटीसीला केराची टोपली दाखवण्यात येत असून इमारतीचा वापर बिनदिक्कतपणे सुरु आहे. अलीकडे सातत्याने या इमारतीचा वरचा भाग कोसळत असून नजिकच्या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. भर बाजारपेठेत नगरपालिकेच्या नोटीसला झुगारून धोकादायक इमारतीचा वापर सुरु असताना देखील पालिका प्रशासन इकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून आपण याप्रकरणी जातीनीशी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन देखील उपस्थित होते. ही धोकादायक इमारत कोसळून आपत्ती निर्माण झाल्यास त्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!