सिंधुदुर्ग जि. प. च्या वतीने आठ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

मालवण तालुक्यातील कातवड, घुमडे गावच्या ग्रामसेविका युती युवराज चव्हाण यांचाही समावेश

कुणाल मांजरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर यशस्वीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याऱ्या ८ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मालवण तालुक्यातील कातवड, घुमडे गावच्या ग्रामसेविका सौ. युती युवराज चव्हाण उर्फ हर्षदा मसुरकर यांचाही समावेश आहे.

आदर्श ग्रामसेवकांना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव करण्यासाठी शासन निकषानुसार २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाने विहीत केलेल्या शर्तीच्या शिफारशीनुसार व शासन निकषानुसार सन २०२०-२१ या वर्षाकरीता या ८ ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रदीप रमेश नारकर, कुडाळ तालुक्यातील कवठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतीश श्रीधर साळगावकर , मालवण तालुक्यातील कातवड घुमडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीम. युती युवराज चव्हाण, कणकवली तालुक्यातील नरडवे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वैभव विनायक धुमाळ, दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद श्रीरंग शिंदे, वैभववाडी तालुक्यातील गडमठ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील मोहनराव नागरगोजे, सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमित आत्माराम राऊळ यांचा समावेश आहे. या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!