
‘एकही पात्र मतदार मतदार यादीबाहेर नको’; रोहयोतून अधिकाधिक कामे हाती घेण्याचे निर्देश
सिंधुदुर्ग : मतदार यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश व्हावा, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि संभाव्य पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर), रोजगार हमी योजना आणि विविध शासकीय योजनांचा आढावा घेत संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा आणि गावांमध्ये टिकाऊ मालमत्ता निर्माण व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक कामे मंजूर करून ती प्रत्यक्ष सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामध्ये पाणंद रस्ते, तलावांतील गाळ काढणे, बंधारे बांधणे, चारा लागवड, जलतारा आणि शोषखड्डे निर्मिती यांसारख्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कामांतून रोजगारनिर्मितीबरोबरच जलसंधारण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
टंचाई आराखड्यात पूरक कामांचा समावेश करा
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन आगाऊ करावे. टंचाई आराखडा तयार करतानाच पूरक कामांचा समावेश करावा, जेणेकरून ऐनवेळी पुरवणी आराखडा तयार करण्याची वेळ येणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.पीक पाहणी, डीसीएच ॲप आणि आरटीएस पोर्टलवरील कामकाजाचा आढावा घेताना संबंधित विभागांनी प्रलंबित कामे, सद्यस्थिती आणि आवश्यक कार्यवाही यावर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.







Subscribe to my channel






