‘एमआयटीएम’ कॉलेजच्या पदवीदान सोहळ्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे परखड मत ; रोजगारावर परिणाम होण्याची भीती
माणूस किती वर्ष जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्वाचे ; विद्यार्थ्यांनी जीवनात विनम्रतेचे आचरण करण्याचा सल्ला
मालवण | कुणाल मांजरेकर
बदलत्या तंत्रज्ञानाचे फार मोठे आव्हान आजच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. आज तंत्रज्ञान विश्वात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विकसित झाली आहे. जी माहिती जमा करायला आठ दिवस लागतात, ती माहिती एआयच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटात सहज उपलब्ध होणार आहे. हे एआय तंत्रज्ञान जेवढे फायद्याचे आहे तेवढेच तोट्याचे देखील ठरून त्याचा रोजगारावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विज्ञान क्षेत्रातील हे नॉलेज समाजाच्या फायद्यासाठी वापरायचे की तोट्यासाठी ? याचा राज्यकर्ते व वैज्ञानिकांनी विचार केला पाहिजे. अन्यथा ए आय सोसायटी बरबाद करेल, अशी भीती जागतिक कीर्तींचे अर्थशास्त्रज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे बोलताना केले.
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचा पदवीदान सोहळा संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. त्यावेळी बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल डॉ. मुणगेकर यांनी परखड मत व्यक्त केले. यावेळी एमआयटीएम कॉलेजबाबत बोलताना ग्रामीण भागातील हे इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देत असून विद्यार्थ्यांनी स्वतःचे आई वडील, शिक्षक व या कॉलेजबाबत नेहमीच कृतज्ञता बाळगा. आयुष्यात शिक्षण व शिक्षकांना खूप महत्व आहे. माणूस किती वर्ष जगला, त्यापेक्षा कसा जगला, हे महत्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून मी प्राध्यापक ते मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू, राज्यसभा खासदार पर्यंतचा प्रवास करू शकलो. त्यात शिक्षणाचा फार मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ.मुणगेकर यांच्यासह माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे, ऍड. महेश सरनोबत, प्रा. गौतम मुणगेकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, राकेश सावंत, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस व्ही ढणाल, उपप्राचार्य प्रा. विशाल कुशे, प्रा. पूनम कदम, प्रा. रोशनी वरक, प्रा. जानकी पावसकर, प्रा. संजय कुशे, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रा. सिद्धेश शिंदे आदी मान्यवर तसेच कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मुणगेकर म्हणाले, आजचा कार्यक्रम विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्याचा असल्याने मी बाकीचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून मी आज या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहिलो. मॅट्रिक पास झाल्यानंतर मी वयाच्या १९ व्या वर्षी रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागलो. पण तिकडे माझा जीव रमत नव्हता. म्हणून मी राजीनामा देऊन विद्यापीठात गेलो. शिक्षक होणे ही माझी पहिल्या पासूनची जिद्द होती आणी आवडही होती. पीएचडी झाल्यानंतर प्रोफेसर झालो. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू, नियोजन मंडळ सदस्य, राज्यसभा सदस्य हे सर्व साध्य करत असताना फार मोठा संघर्ष करावा लागला. आम्हाला नोकरी करून शिक्षण करावे लागले. त्या तुलनेत तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही नोकरी केल्याशिवाय तुमच्या आई वडिलांच्या सहकार्याने आज इंजिनिअर झालात. कॉलेजचे अध्यक्ष संतोष पाल हे मूळचे नागपूरचे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फार मोठे धाडस करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ ते दहा एकर जागा घेऊन एवढे मोठे कॉलेज उभे केले आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. विद्यादान हे सर्व प्रकारच्या दानात महत्वाचे दान आहे. आपण कसे जगायचे हे विद्या शिकवते. संतोष पाल हे मुंबईत राहून इकडचं कॉलेज यशस्वीपणे सांभाळतात. त्यातून त्यांचे मॅनेजमेंट कौशल्य दिसून येते. याबद्दल मी त्यांचे सहकारी संचालक, प्राचार्य, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो.
मनुष्य हा एआय पेक्षा कधीही श्रेष्ठच : संतोष पाल
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल म्हणाले, जीवनात अनेक आव्हाने दरवेळी येतात. एआय देखील एक असेच आव्हान आहे. पण मनुष्य हा भावनेवर आधारित काम करत असल्याने एआय पेक्षा कधीही श्रेष्ठच ठरतो. तुम्ही कोण बनता, त्यापेक्षा तुम्ही जीवनात कोणते ध्येय साध्य केले, ते महत्वाचे आहे. या कार्यक्रमाला येण्यापुर्वी डॉ. मुणगेकर यांना आरोग्य विषयक त्रास झाला. तरी देखील ते विद्यार्थ्यांसाठी मुद्दामहून या कार्यक्रमाला आले. आज एम आय टी एम कॉलेज शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचे श्रेय केवळ मला एकटयाला नव्हे तर माझ्यासह अन्य चार संचालकांना देखील आहे. आमच्या कॉलेजच्या यशात आमच्या पत्नींचा देखील मोठा सहभाग आहे, असे ते म्हणाले. जीवनात तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर जबाबदारी घ्यायला शिका. जीवनात एखादी स्टार्ट अपकंपनी सुरु करायची असेल तर त्यासाठी मानसिकता, गुंतवणूक व कर्मचारी सांभाळण्याची क्षमता हवी. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐकायची क्षमता ठेवा. त्यासाठी स्वामी विवेकानंद, चाणक्य वाचा, असे सांगून खरे शिक्षण कॉलेजच्या अभ्यासक्रमात मिळत नाही. तुम्हीच तुमच्यातले गुण शोधा. आमच्या कॉलेज मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या टीम मेंबर मुळेच हे कॉलेज यशस्वी झाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मी देखील संघर्ष करूनच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदापर्यंत पोहोचलो. हे कॉलेज देखील मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. मुंबई विद्यापीठाचा जगात नावलौकिक असून अशा विद्यापीठातून तुम्ही आज इंजिनिअर ही पदवी घेऊन बाहेर पडणार आहात, असे ते म्हणाले. यावेळी ए आय च्या वाढत्या वापराबाबत त्यांनी सविस्तरपणे विवेचन करून चिंता व्यक्त केली. शिक्षकांनी देखील विद्यार्थी हे आपले दैवत आहेत, असे समजून त्याना उद्या समाजात उभे राहताना त्यांना उपयोगी ठरेल, असे ज्ञान द्यावे. विद्यार्थ्यांनी देखील यशाने जास्त आनंदित होऊ नये व अपयशाने खचून जाऊ नये. मला इंटरच्या परीक्षेला 43.5 % मार्क मिळाले त्यामुळे मला सेकंड क्लास मिळाला नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या राजाभाई टॉवरच्या खाली मी ढसाढसा रडलो. मॅट्रिकला मला 70% मार्क होते. शाळेत पहिला होतो. पण ज्या राजाभाई टॉवर च्या खाली मी रडलो, तोच भालचंद्र मुणगेकर खचून न जाता त्याचं मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो, हे तुम्ही मनात खूणगाठ बांधा. तुम्हाला पावलोपावली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, जाती धर्माच्या अडचणी येतील, त्यावर दुर्लक्ष करा. अजूनही सर्व सत्तास्थानात पुरुषांचे वर्चस्व असल्याने स्त्रियांना खूप अडचणी येतात, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. विद्येमुळे तुम्ही अधिक नम्र व्हायला पाहिजे. इतर लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत, असे विचार तुमच्या मनात येतील, अशावेळी तुमच्या डिग्रीची किंमत शून्य असेल. गरीब, उपेक्षित लोकांविषयी तुमच्या मनात जास्त सहानुभूती पाहिजे. बुद्ध, महावीरांच्या मनात ती सहानुभूती होती. सर्व संतांच्या मनात ती सहानुभूती होती. हे मला शिक्षकांनी शिकवलं. एवढं आयुष्यात शिक्षण व शिक्षकांना महत्व आहे. आज तुमच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. आज तुम्ही नव्या जगात प्रवेश कराल, पण नेहमी हे कॉलेज व संस्थेविषयी नेहमी मनात कृतज्ञता बाळगा, असे डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले.
यावेळी माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे यांनी आपण गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून पहिले न्यायाधीश बनण्याचे धाडस केल्याचे सांगून आपला जीवनप्रवास कथन केला. आज येथील विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. जीवनातील महत्वाची पायरी आज तुम्ही पार केली आहे. तरी देखील भविष्यासाठी खूप मेहनत घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तळ्यापर्यंत नेले आहे. तुम्हांला पोहून पुढे जायचे आहे. त्यासाठी मेहनत करायची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पडायला हवी, असे ते म्हणाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, आज डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे, ऍड. महेश सरनोबत यांच्यासारख्या महनीय व्यक्ती आज आपल्याला लाभल्या आहेत. हे आपले भाग्य आहे. जीवनात नवीन सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवले पाहिजे. भविष्यात तुमचा नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न करा. एमआयटीएम कॉलेज मधून मागील १५ वर्षात ५ हजार हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले असून त्यातील ३ हजार विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. तर २ हजार विद्यार्थी व्यवसाय करत आहेत. त्यांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन श्री. सावंत यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल म्हणाले, आमच्या कॉलेज मधून इंजिनिअर होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या नोकरीची संधी मिळते हा आजवरचा इतिहास आहे. मागील चार वर्षांच्या आठवणी एकत्र करण्याचा आजचा दिवस असून या आठवणी सोबत घेऊन तुम्हाला बाहेर जायचे आहे. आजपासून तुमच्या आयुष्याला कलटणी मिळणार आहे. या प्रवासात एमआयटीएम परिवार कायम तुमच्या पाठीशी असणार आहे, सर्व विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे काम करून जीवनात यशस्वी व्हावे, असे ते म्हणाले. यावेळी महेश सरनोबत यांनीही विचार मांडले.