
३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज; १७ सप्टेंबर अंतिम मुदत ; ७०% पदांसाठी जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, देशातील अग्रगण्य संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
शासनाने नव्याने निर्धारित केलेल्या निवड निकषांनुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूण पदांपैकी ७० टक्के पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य, तर उर्वरित ३० टक्के पदांसाठी जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांचा विचार केला जाणार आहे.
परीक्षेसाठी उमेदवारांना जीएसटीसहित ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑफलाइन पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील खात्यावर जमा करता येईल. बँकेच्या कोणत्याही शाखेत कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत शुल्क भरता येणार आहे. तसेच NEFT, IMPS किंवा Account Transfer द्वारेही शुल्क भरता येणार असून, त्याचा Transaction ID अर्जात नमूद करून पैसे भरल्याची काउंटर पार्ट अथवा ट्रान्झॅक्शनचा फोटो/स्क्रीनशॉट अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे अनिवार्य आहे.
उमेदवारांनी अर्ज केवळ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरावा. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि संगणकीकृत पद्धतीने TCS मार्फत राबविण्यात येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्यास TCS हेल्पलाईन क्रमांक ७९९६१०४१११ वर संपर्क साधता येईल. इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.







Subscribe to my channel






