वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा झाला होता खंडित; स्थानिक रहिवाशांनी मानले आभार
मालवण : रविवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे दांडी परिसरात मोठी पडझड झाली. यामध्ये विजेचा पोल कोसळल्याने हिंदळेकर वाडी, गर्दे रोड आणि दांडी भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. मात्र, लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत आज संध्याकाळी ६ वाजता हा वीजपुरवठा यशस्वीपणे सुरळीत केला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने या समस्येची दखल घेतली. त्यांनी आज सकाळपासूनच ‘महावितरण’ कडे सातत्याने फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून वीजवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रतीक्षा पवार आणि त्यांच्या टीमने दिवसभर अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सोबतीला महावितरणचे अधिकारी सचिन मेहेत्रे आणि श्री. मयेकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. तसेच स्थानिक नागरिक शैलेश मयेकर आणि चंद्रकांत मयेकर यांनीही या संपूर्ण कामात मोलाचे सहकार्य केले. ऐन पावसाळा आणि वादळाच्या दिवसांत अवघ्या २४ तासांच्या आत वीजपुरवठा पुन्हा सुरू केल्याबद्दल हिंदळेकर वाडी, गर्दे रोड आणि दांडी भागातील नागरिकांनी सभापती अन्वेषा आचरेकर, प्रतीक्षा पवार टीम आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.