सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार

संभाव्य दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हावासियांना आवाहन

उद्योगपती, व्यापारी, संस्था, संघटनांसह प्रत्येक घटकाला जलसंवर्धनाच्या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबासमोर संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचे संकट उभे राहत असताना त्यावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आहे. ‘आपला जिल्हा, आपली जबाबदारी’ या भावनेतून सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती, घटत चाललेली पाणीपातळी आणि आगामी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत विविध संस्था, संघटना आणि तज्ज्ञांची बैठक मायनाक भंडारी सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना केवळ प्रशासनाच्या माध्यमातून न करता लोकसहभागातून जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येत जलसंधारणाची कामे, श्रमदान आणि जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी केले.व्यापारी महासंघ, पाणी व कृषी क्षेत्रात कार्यरत संस्था, रोटरी व लायन्स क्लब, फार्मासिस्ट असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना, हॉटेल महासंघ, जिल्हा पत्रकार संघ यांसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. जलसंधारणाची कामे शास्त्रीय पद्धतीने आणि स्थानिक गरजेनुसार झाली पाहिजेत, अशी सूचना पाणी परिषदेचे डॉ. अविनाश पोळ यांनी केली. भूजल सर्वेक्षण विभागाच्या मदतीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विविध तज्ज्ञांनी पाण्याचे स्रोत बळकट करणे, जलसंधारणाची कामे वाढविणे आणि उपलब्ध साधनसंपत्तीचे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याबाबत सूचना केल्या.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुभवाचा प्रशासनाला मोठा उपयोग होऊ शकतो, असे सांगत विविध संस्थांनी प्रशासनाच्या जलसंवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

प्रत्येक तालुक्यात स्थानिक गरजेनुसार कृती आराखडा

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ चर्चा न करता जलसंधारणाची कामे प्रत्यक्ष जमिनीवर उभी राहिली पाहिजेत, असे स्पष्ट करत पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक भागात स्थानिक गरजेनुसार बैठका घेऊन कृती आराखडा तयार करावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. जेसीबी व डंपर व्यावसायिक संघटनांनी जलसंधारणाच्या कामात योगदान द्यावे. शाळा-महाविद्यालये, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनाही या मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा, चारा बियाण्यांची उपलब्धता, पानवठे व झरे बळकट करणे, शेततळी निर्माण करणे, पाणीटंचाईच्या भागात बंधाऱ्यांना प्राधान्य देणे तसेच पाण्याची पातळी वाढविणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यावर भर देण्यात आला.

जिल्हा बँकेकडून २५ हजार सिमेंट पोती; भगीरथ संस्थेचा १० लाखांचा निधी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला बैठकीत तातडीने प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जलसंधारणाच्या बंधाऱ्यांसाठी २५ हजार रिकामी सिमेंट पोती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तर ‘भगीरथ’ या सामाजिक संस्थेने दुष्काळ निवारणासाठी १० लाख रुपयांचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून ठेवल्याची माहिती दिली. या पुढाकारामुळे जिल्ह्यातील इतर संस्था, उद्योगपती, व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.

आजच्या साधनसंपत्तीचे उद्याच्या संकटासाठी नियोजन

सध्या उपलब्ध असलेला हिरवा चारा वाया जाऊ नये यासाठी तो कापून, वाळवून सुरक्षित साठवून ठेवावा, जेणेकरून भविष्यात त्याचा जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोग करता येईल, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. आज उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचे उद्याच्या संभाव्य संकटाच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची भक्कम जोड मिळाल्यास संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तीने पुढे येत जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामात योगदान द्यावे. ‘सिंधुदुर्ग हे आपले कुटुंब’ मानून या संकटाच्या काळात प्रत्येकाने पाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!