प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायातील संधीचा लाभ घ्या

मालवण मधील कार्यशाळेत उद्योजक निलेश घाटकर यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यातील ५२ नवउद्योजकांचा कार्यशाळेत सहभाग

कुणाल मांजरेकर

मालवण : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत रोजगाराच्या अनेक संधी दडलेल्या असून नवीन उद्योजकांनी या योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायात नवीन प्रकल्प साकार करावेत, असे प्रतिपादन उद्योजक निलेश घाटकर यांनी मालवण येथील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
 

श्री सदगुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा” रविवारी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खुल्या समुद्रातील पिंजरा मत्स्य संवर्धन, समुद्री शेवाळ संवर्धन,  शिंपले संवर्धन, शोभिवंत मत्स्यपालन, मोठया आकाराचे  RAS कप, बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मार्गदर्शन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उद्योजक निलेश घाटकर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून चंद्रशेखर पुनाळेकर उपाध्यक्ष – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर, तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, मत्स्य उद्योजक मेहता उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये FSTO चे व्यवस्थापक परमेश्वर नवघरे, विनायक कुर्‍हाडे यांनी बँकेच्या विविध योजना आणि अर्थसहाय्याबद्दल मार्गदर्शन केले. तर प्रभारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त रविंद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवणचे प्रशिक्षण अधिकारी प्रदिप सुर्वे यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल मार्गदर्शन केले. उद्योजकांच्या सोयीसाठी सिंधुदुर्गमथ्ये रेल्वेचे बुकिंग ऑफिस सुरु करण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यातील ५२ नव उद्योजकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी संस्थेच्यावतीने मत्स्य संपदा योजना कार्यान्वित करण्यासाठी नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल तयार करणे, आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बँका आणि नवउद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधून आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी मदत केली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक महेश मांजरेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार संस्थेचे सचिव भालचंद्र राऊत यांनी मानले. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळेचे समन्वयक राजेश साळगावकर आणि सहसमन्वयक अभिमन्यू गावडे उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!