
मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मालवण : गणेशोत्सवाला अवघे १२ दिवस शिल्लक असून मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा तसेच रो रो जलवाहतूक सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असून मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो सिंधुदुर्गवासीय या काळात आपल्या गावी परततात. अनेकांना केवळ दोन-तीन दिवसांचीच सुट्टी मिळत असल्याने जलद आणि सुविधाजनक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपर्यंत पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, अद्याप विमानसेवा सुरू न झाल्याने जनतेच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्गासाठी हवाईमार्गाबरोबरच जलमार्ग हा देखील वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय आहे. मोठ्या अपेक्षेने सुरू करण्यात आलेली रो रो सेवा काही दिवसांनंतर बंद झाल्याने नागरिकांना पुन्हा मर्यादित वाहतूक पर्यायांवर अवलंबून राहावे लागत आहे. रेल्वेने मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी साधारण १० तास किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे विमानसेवा सुरू झाल्यास चाकरमानी आणि गणेशभक्तांना कमी वेळेत गावी पोहोचून कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करता येईल, तसेच सुट्टीनंतर वेळेत कामावर परतणेही शक्य होईल. ‘जनतेला केवळ आश्वासने नकोत; प्रत्यक्ष सुविधा हव्या आहेत,’ असेही मनसेने म्हटले आहे.







Subscribe to my channel






