भाजपच्या संघटनबांधणीला वेग; दापोली-मंडणगड-खेडमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’

आमदार प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे बैठक’चा मंत्र; जनसंपर्क, सेवा उपक्रम आणि ‘मन की बात’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

दापोली : आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देत भारतीय जनता पार्टीने २६३-दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघात संघटनबांधणीवर भर दिला आहे. विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी थेट कृती आराखडा दिला.

पक्षाची संघटनात्मक ताकद गावागावात पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’, ‘गाव तिथे बैठक’ आणि ‘मन की बात’ हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी केले. प्रत्येक गावातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधत त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेणे, जनसंपर्क वाढविणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

‘गाव तिथे बैठक’ या माध्यमातून बूथ आणि गावपातळीवरील संघटन अधिक सक्रिय करण्याची दिशा बैठकीत देण्यात आली. केवळ बैठका घेण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांशी जोडले जाण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना करण्यात आले.

या चिंतन बैठकीला रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिता जावकर, माजी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे, भाजपा नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सरचिटणीस अक्षय फाटक, वसंतजी ताम्हणकर, दापोली पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, दापोली शहर मंडल अध्यक्ष व नगरसेविका जया ताई साळवी, दापोली ग्रामीण अध्यक्ष सचिन होडबे, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड नगरपालिका नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटन गावपातळीवर अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

error: Content is protected !!