मासेमारीला गेले अन् काळाने घातला घाला; दोघांचा बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग किल्ल्यालगत खडकाळ समुद्रात दुर्घटना; एकाला मच्छीमारांनी वाचवले

मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्या नजिकच्या समुद्राने आज सकाळी अक्षरशः रौद्ररूप धारण केले. मासेमारीसाठी गेलेल्या ‘सागरिका’ (आयएनडी एमएच ५ एम एम १४८४) या पातीला किल्ल्याच्या मागील खडकाळ समुद्रात आलेल्या प्रचंड लाटेने जोरदार तडाखा दिला आणि क्षणार्धात पात उलटली. या दुर्घटनेत दांडी येथील भाजपचे तालुका उपाध्यक्ष व मच्छीमार सन्मेष सुरेश परब (४९) आणि अक्षय हनुमंत राणे (३०) यांचा बुडून मृत्यू झाला. तर सुयोग सन्मेष परब (२२) याला स्थानिक मच्छीमारांनी जीवाची बाजी लावत सुखरूप बाहेर काढले.

पहाटेच्या सुमारास सन्मेष परब, अक्षय राणे आणि सुयोग परब हे तिघे ‘सागरिका’ पातीने मासेमारीसाठी किल्ले सिंधुदुर्गलगतच्या समुद्रात गेले होते. सकाळी सातच्या सुमारास किल्ल्याच्या पाठीमागील खडकाळ भागात समुद्र अचानक खवळला. काही कळायच्या आत आलेल्या मोठ्या लाटेने पातीला जोरदार धडक दिली. लाटेचा तडाखा इतका जबरदस्त होता की पात क्षणार्धात उलटली आणि तिघेही समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.

या थरारक प्रसंगात सुयोग परब पाण्यात पोहत मदतीसाठी धडपडत होता. त्याचवेळी जवळून जाणाऱ्या जयदेव लोणे यांच्या नौकेतील मच्छीमारांच्या नजरेस तो पडला. क्षणाचाही विलंब न करता मच्छीमारांनी त्याला नौकेवर घेतले आणि त्याचा जीव वाचवला. मात्र, सन्मेष परब आणि अक्षय राणे यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने किनाऱ्यावर चिंता वाढली. समुद्राने दोघांना आपल्या लाटांमध्ये गिळंकृत केल्याने स्थानिक मच्छीमारांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. खवळलेल्या समुद्रात जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या शोधमोहीमेला अखेर यश आले. किल्ल्यानजीकच्या समुद्रात सन्मेष परब यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर काही वेळाने अक्षय राणे यांचाही मृतदेह सापडला. मच्छीमारांनी दोन्ही मृतदेह किनाऱ्यावर आणले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी ते मालवण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

सन्मेष परब हे दांडी येथील भाजपचे सक्रिय पदाधिकारी होते. ते मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब यांचे पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहिणी असा परिवार आहे. एकाच दुर्घटनेत दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने दांडीसह मालवण शहर परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील आणि करिश्मा चिंदरकर यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, दुर्घटनेचे वृत्त समजताच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, महिला बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, तात्या धुरी, नगरसेवक ललित चव्हाण, आना मोंडकर, सुजित मोंडकर, वसंत गावकर, दिलीप पराडकर, आनंद पराडकर, बाबू आचरेकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मच्छीमार बांधवांनी किनाऱ्यावर तसेच रुग्णालयात धाव घेतली.

क्षणात होत्याचे नव्हते…

दररोजच्या उदरनिर्वाहासाठी समुद्रात गेलेल्या तिघांवर काही क्षणांत काळाने घाला घातला. एकाला जीवदान मिळाले; मात्र दोघांचा समुद्राच्या लाटांमध्ये दुर्दैवी अंत झाला. या घटनेने मालवणच्या मच्छीमार समाजाला मोठा धक्का बसला आहे.

error: Content is protected !!