
आधुनिक तंत्रज्ञानातून मच्छीमारांच्या उत्पन्नवाढीला बळ : नितेश राणे
विजयवाडा, आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयाला भेट देत राज्यातील मत्स्यव्यवसाय आणि ॲक्वाकल्चर क्षेत्राच्या विकास मॉडेलचा सविस्तर अभ्यास केला. मत्स्य उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मच्छीमार कल्याण आणि उत्पादनापासून निर्यातीपर्यंतची एकात्मिक मूल्यसाखळी याबाबत यावेळी सविस्तर माहिती घेण्यात आली.
आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयात झालेल्या बैठकीत सागरी मत्स्यव्यवसाय, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि ॲक्वाकल्चर क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये AI आधारित Aquaculture 4.0, मत्स्य आरोग्य व रोग निरीक्षण, पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम परीक्षण, स्मार्ट फीडिंग, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण, RAS व Biofloc तंत्रज्ञान, IoT आधारित ॲक्वाकल्चर, डिजिटल ट्रेसेबिलिटी, तलाव नोंदणी, प्रजाती विविधीकरण, बोटींचे ट्रॅकिंग आणि मासेमारीतील पकड निरीक्षण या बाबींचा समावेश होता.
याशिवाय समुद्री शेवाळ लागवड, कृत्रिम प्रवाळ भित्तिका, खुल्या समुद्रातील केज कल्चर, हवामान बदलास सक्षम किनारी मच्छीमार गावे तसेच अंतर्देशीय जलस्रोतांचा शास्त्रीय व उत्पादक पद्धतीने वापर याबाबतही माहिती घेण्यात आली.

उत्पादनापासून निर्यातीपर्यंत एकात्मिक मूल्यसाखळी
हॅचरी, मत्स्य खाद्य, प्रयोगशाळा, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात या सर्व घटकांना परस्परांशी जोडणाऱ्या एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीच्या विकास मॉडेलचा यावेळी अभ्यास करण्यात आला. उत्पादनापासून प्रक्रिया, बाजारपेठ आणि निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मत्स्य शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आंध्र प्रदेशात करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहितीही घेण्यात आली.
महाराष्ट्रासाठी उपयुक्त प्रयोगांची अंमलबजावणी करणार
आंध्र प्रदेशातील तंत्रज्ञान, डेटा-आधारित व्यवस्थापन आणि संस्थात्मक कार्यपद्धतीतील महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बाबींचा अभ्यास करून त्यांचा राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी वापर करण्यात येईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे, मत्स्य शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत तसेच जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविणे, हा या अभ्यास दौऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीसह अंतर्देशीय जलस्रोतांचा अधिक शास्त्रीय आणि उत्पादक पद्धतीने उपयोग करून मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि किनारी समुदायांसाठी अधिक मूल्यनिर्मिती करण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशातील उपयुक्त प्रयोगांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आंध्र प्रदेशचे मत्स्य आयुक्त रामा नाईक, अतिरिक्त संचालक डॉ. शंकर राव, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, सहआयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







Subscribe to my channel






