स्टेट बँक लुटीप्रकरणातील संशयिताची पिंगुळीतील २२ लाखांच्या घरफोडीची कबुली!

बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील पानबाजार परिसरातील स्टेट बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या भक्तराज वासुदेव सडवेलकर (वय २८, रा. पिंगुळी-काळेपाणी) याने पिंगुळी येथील सुमारे २२ लाख रुपये किमतीच्या घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी कुडाळ पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगुळी-काळेपाणी येथील शुभांगी शंकर सावंत यांचे बंद घर फोडून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ही चोरी झाली होती. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १४ तोळे वजनाचे, अंदाजे २१ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरीस गेली होती.

विशेष म्हणजे, तक्रारदार सावंत यांचे घर संशयित भक्तराज सडवेलकर याच्या घराशेजारीच आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा त्याच्याकडे वळवली. चौकशीदरम्यान त्याने या घरफोडीत सहभाग असल्याची कबुली दिल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक केली.

दरम्यान, कुडाळ-पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चाकूचा धाक दाखवून ३३ लाख ६ हजार २४० रुपये लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भक्तराज सडवेलकर याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. बँकेचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

आता पिंगुळीतील घरफोडीप्रकरणी शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तपास करत असून हवालदार महेश भोई आणि सिद्धेश चिपकर सहकार्य करत आहेत.

error: Content is protected !!