मालवण | रांगोळी महाराज मठानजिक वीज खांबावर मोटार कार आदळून अपघात 

सायकलस्वाराला वाचविताना दुर्घटना ; मोटारीसह, महावितरणचे नुकसान

मालवण : समोरून येणाऱ्या सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका मोटारीने रस्त्याकडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात वीज खांब तुटला. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात भरड येथील रांगोळी महाराज मठाजवळ, गवंडीवाडा-दांडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर झाला.

कोल्हापूरहून आलेली मोटार या रस्त्यावरून जात असताना समोर अचानक एक सायकलस्वार आला. त्याला बाजू देण्यासाठी मोटारचालकाने गाडी बाजूला घेतली. पण मोटार थेट रस्त्यालगतच्या वीज खांबावर आदळली. धडकेमुळे सिमेंटचा खांब खालच्या बाजूने तुटून वाकला आणि वीजेच्या तारा खाली आल्या. मोटारीच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले. मोटारीत चार ते पाच प्रवासी होते. पण सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर मोटारीतील प्रवाशांनी वीज खांबाच्या नुकसानीची भरपाई महावितरणला दिल्यावर हे प्रकरण मिटवण्यात आले असे समजते.

error: Content is protected !!