
भारतीय जनता पार्टी चिंदर आणि माय माऊली ग्रुप चिंदर यांच्या वतीने आयोजन ; महिला गटात पैठणी, पुरुष गटात रोख पारितोषिकांची लयलूट
मालवण : नारळ लढवण्याच्या प्रत्येक फेरीसोबत वाढणारा उत्साह, विजयासाठी रंगलेली चुरस आणि विजेत्यांच्या घोषणेनंतर झालेला जल्लोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत आणि माय माऊली ग्रुप चिंदर आयोजित ‘आचरा जिल्हा परिषद मतदारसंघ मर्यादित नारळ लढवणे स्पर्धा पर्व २ रे’ दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सविता लाड, दर्शन चिंदरकर विजेते ठरले.
बुधवारी भगवती मंदिर नजिक, चिंदर भटवाडी येथे झालेल्या या स्पर्धेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक नारळ लढवण्याच्या या रंगतदार स्पर्धेने चिंदर परिसरात चांगलाच उत्साह निर्माण केला. पुरुष गटासाठी पहिल्या १०० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात आले होते, तर महिला गटासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला. त्यामुळे महिलांनीही मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये विजयासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली.
महिला गटात सविता लाड अव्वल
महिला गटात आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सविता लाड यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणी व चषकावर नाव कोरले. तर प्रियांका कावले यांनी द्वितीय क्रमांक मिळवत मिक्सर व चषक पटकावला.
पुरुष गटात दर्शन चिंदरकर यांची बाजी
पुरुष गटातील अंतिम फेरीत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत दर्शन चिंदरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५,५५५ रुपये रोख आणि चषक आपल्या नावे केला. सागर परुळेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ३,३३३ रुपये रोख व चषक पटकावला.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांचा सत्कार होताच उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, संतोष गावकर, देवेंद्र हडकर, संतोष अपराज, सागर अपराज, निशांत पारकर, शेखर पाताडे, शेखर पालकर, दिगंबर जाधव, मिथुन चिंदरकर, अमित पवार, विराज सावंत, प्रिया पालकर, देविका जाधव, कांबळी बंधू यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माय माऊली ग्रुप चिंदरच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे चिंदरमध्ये नारळ लढवण्याच्या परंपरेला पुन्हा एकदा उत्साहाची किनार लाभली.






Subscribe to my channel






