अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा व काजू पिकाला धोका

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

यावेळी वेंगुर्ल्याचे माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, वेंगुर्ला तालुक्यातील प्रतिष्ठित बागायतदार व व्यापारी प्रकाश विश्राम बोवलेकर, श्यामसुंदर राय वेंगुर्ला तालुक्यातील इतर प्रतिष्ठित व्यापारी व बागायतदार उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अचानक झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे सध्या झाडांवर काही प्रमाणात शिल्लक असलेली फळे गळून पडणार असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. याबाबत पालकमंत्री महोदयांना देखील निवेदन दिले असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून, बदललेल्या वातावरणाबाबत व झालेल्या अवकाळी पावसाबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा व ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नोंद ऑनलाईन झालेली नाही, त्यांची ऑफलाइन नोंद करण्याबाबत तलाठ्यांना त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतल्यास फळ बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!