सतीश सावंतांच्या निवडणूकीत वैभव नाईकांची गद्दारी : निलेश राणेंचा सनसनाटी आरोप
वैभव नाईक हीच शिवसेनेला लागलेली कीड ; त्यांचा डीएनए तपासा
पुष्पसेन सावंतांपासून सतीश सावंतांच्या २०१९ च्या निवडणूकीतील प्रत्येक चालींची दिली माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी मालवण येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेत शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वैभव नाईक हे मूळ शिवसैनिक नव्हेत. आम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर वैभव नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हवं तर त्यांचा डीएनए तपासा, असं सांगून शिवसेनेतील प्रत्येक घडामोडीची वैभव नाईक यांच्या माध्यमातूनच आमच्यापर्यंत माहिती मिळत होती. पुष्पसेन सावंत यांच्यापासून सतीश सावंत यांच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या प्रत्येक चालींची माहिती नितेश राणेंपर्यंत पोहचवण्याचे काम वैभव नाईक यांनी केले. वैभव नाईक हीच शिवसेनेला लागलेली कीड आहे, असा आरोप निलेश राणे यांनी करून राजकीय गोटात खळबळ उडवून दिली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची सभा माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी भाजपच्या कार्यालयात घेण्यात आली. या सभेला तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, आबा हडकर, बाळू कुबल, ललित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांचा समाचार घेतला. मालवण शहरात शिवसेनेबाबत प्रचंड नाराजी आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी अलीकडेच नगरपालिकेच्या कारभारासह वैभव नाईक यांचे वाभाडे काढले आहेत. शहरातील महत्त्वाच्या विषयांना आचरेकरांनी वाचा फोडली. वैभव नाईक हा वास्तविक नगरसेवक कॅटेगरीचा माणूस आहे. यापूर्वी वैभव नाईक हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याला पण माहीत नव्हते, त्याच्या हातात एवढी मोठी नगरपालिका दिली. ज्याला अर्धी कणकवली ओळखत नव्हती, त्याला तुम्ही आमदार केलात, सात वर्षात त्यांनी काय काम केले ? घनकचरा, बस डेपो, आराखडा असे अनेक विषय आज प्रलंबित आहेत. या सात वर्षात एक तरी विषय वैभव नाईकांनी मार्गी लावला का ? वैभव नाईकला मंत्रालयात कोण ओळखत नाही. मंत्रालयातील क्लार्क समोर स्टूलावर बसून हा आपली निवेदने देतो. राणेसाहेब असताना मालवणचे विषय हाताळले नाही तर तो अधिकारी त्या खुर्चीवर राहील का ? ही भीती अधिकाऱ्यांमध्ये होती. राणेसाहेबांचा हा दरारा आम्ही पाहीला आहे. वैभव नाईक मोठा निधी आणल्याच्या बाता मारतो, मागील सात वर्षात त्यांनी पूर्णत्वास नेले एक तरी काम सांगावे. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी रोड असलेला कोस्टल हायवे निधी अभावी रखडला आहे, असे असताना मुख्यमंत्री ठाकरे वैभव नाईकला कोट्यावधीचा निधी देतील का ? मालवण शहराला एक दर्जा आहे. पण या शहराची वैभव नाईकने वाट लावल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.
वैभव नाईक काँग्रेसची अवलाद आहे. तो शिवसैनिक नाही. आजवर आम्हाला प्रत्येक निवडणुकीची खडानखडा माहिती त्याच्याकडूनच मिळाली आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात कधी येणार ? त्यांच्यासोबत मुंबई-ठाण्यातून किती गाड्या आल्यात, हे सांगणारा कोण आहे ? तो वैभव नाईकच आहे. शिवसेनेतील हीच ती कीड आहे विनायक राऊत यांनी इतरांवर आरोप करण्यापूर्वी आपल्या आजूबाजूला बघावे, असे सांगून हा माणूस इतरांना गद्दार म्हणणार. पुष्पसेन सावंत यांच्यापासून सतीश सावंतांच्या अलीकडच्या निवडणुकीपर्यंत त्यांच्या प्रत्येक चालीची माहिती आमच्यापर्यंत देण्याचे काम वैभव नाईकने केले आहे, असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
२०२४ नंतर वैभव नाईक आमदार राहणार नाही
राणेसाहेबांना जेवढी पदे मिळाली, तेवढे वैभव नाईककडे कपडे सुद्धा नाहीत. महाराष्ट्रात राणेसाहेब कुठेही उभे राहिले तरी त्यांना बघायला गर्दी जमा होते. तर वैभव नाईकला मंत्रालयात कोणी ओळखत नाही. त्याला आत येण्यासाठी सुप्रिया सुळे यांची मदत घ्यावी लागते आणि हा माणूस राणेसाहेबांवर बोलतो. २०२४ नंतर वैभव नाईक कधीच आमदार होणार नाही, जनतेतून तर तो निवडून कधीच येणार नाही, असे सांगून केवळ राणेसाहेब आणि आमच्यावर टीका करून मतदार संघाचे केलेले वाटोळे सुधारणार नसल्याचे निलेश राणे म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत यांचा अर्धा वेळ रत्नागिरीत जातो, मग जिल्ह्याकडे लक्ष देणार कोण ? विनायक राऊत उद्या उभा राहील की नाही हे सांगता येत नाही, त्याला पोटाची कावीळ आहे. तो शत्रू असला तरी या आजारातून लवकर बरा हो अशी मी प्रार्थना करतो, असे निलेश राणे म्हणाले. वैभव नाईकने सभागृहात गाजवलेले एक भाषण दाखवावे. उद्या २०२४ नंतर तो रिकामी झाल्यानंतर माझ्याकडे पाच हजार रुपये पगारावर वैभव नाईकला बॉडीगार्ड ठेवणार, असे निलेश राणे म्हणाले.