विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप; X पोस्टमधून आमदार निलेश राणेंचा नवनाथ बन यांच्यावर थेट हल्ला
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागा मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवासाठी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुणे आणि नागपूरमध्ये शिवसेनेकडून महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, पुण्यात शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने मतविभाजन झाले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात प्रचार केल्याचा आरोप बन यांनी केला. शिवसेनेने युतीधर्म पाळला असता तर महायुतीला पाचही जागा जिंकता आल्या असत्या, असा दावाही त्यांनी केला.
या आरोपांना उत्तर देताना निलेश राणे यांनी शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळल्याचे स्पष्ट करत, उगाच हवेत बाण मारू नका, अशी भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी X पोस्टमधून नवनाथ बन यांच्यावर थेट निशाणा साधला.”नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती,” अशा शब्दांत राणे यांनी सुनावले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळते, असे स्पष्ट केले. पुण्यात शिवसेना पुरस्कृत उमेदवार आणि भाजप उमेदवार यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होती, असेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून सुरू झालेला हा वाद आता मित्रपक्षांच्या नेत्यांमधील शाब्दिक संघर्षापर्यंत पोहोचला असून, नवनाथ बन यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




Subscribe to my channel




