भारत देशाला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत बनवण्यासाठी आपले योगदान द्या : धोंडी चिंदरकर


मालवण : भाजप स्थापना दिनानिमित्त मालवण तालुक्यात विविध समाजाउपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने आज मालवण भाजप कार्यालयात गणेश पूजन तसेच भाजप पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. भारत देशाला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत बनवण्यासाठी आपले योगदान द्या. नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पाने पुढे जाऊया भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनविण्यासाठी एकत्र काम करूया असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी यावेळी केले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका सचिव महेश मांजरेकर, तालुका उद्योग व्यापार आघाडी रोहेश गावकर, तालुका सरचिटणीस पंकज सादये, राजू परुळेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक ललित चव्हाण, यतीन खोत, राजू परब , केदार झाड, दाजी सावजी, महिला तालुकाध्यक्ष चारूशीला आचरेकर, शहर अध्यक्ष महिमा मयेकर, रश्मी लुडबे, शिल्पा खोत, समृद्धी आसोलकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, पंचायत समिती उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, दीपक सुर्वे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री चिंदरकर म्हणाले, आजचा हा दिवस केवळ एका राजकीय पक्षाच्या स्थापनेचा दिवस नसून, राष्ट्रनिष्ठा, त्याग, सेवा आणि विकासाच्या विचारांचा उत्सव आहे. भाजप पक्षाची स्थापना १९८० साली झाली आणि त्या दिवसापासून पक्षाने देशहिताला सर्वोच्च मानत अखंडपणे जनसेवेचे कार्य केले आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रप्रेम, सांस्कृतिक वारसा आणि सर्वसमावेशक विकास यावर आधारित आहे. महान नेत्यांनी पक्षाला मजबूत पाया दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाने जनतेचा विश्वास संपादन केला आणि देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली.
आज यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत. पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत यांसारख्या अनेक उपक्रमांमुळे भारताची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण झाली आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांच्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे समाजाच्या प्रत्येक घटकाला बळकटी मिळाली आहे.भाजप हा केवळ एक पक्ष नाही, तर तो एक विचार आहे, एक चळवळ आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचून सेवा करण्याची भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. पक्षाची खरी ताकद म्हणजे त्याचे समर्पित कार्यकर्ते, जे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रसेवेसाठी तत्पर असतात. आजच्या या स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. देशाला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत बनवण्यासाठी आपले योगदान देऊ. असे आवाहन श्री. चिंदरकर यांनी केले.
यावेळी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, आजचा हा दिवस फक्त एका पक्षाचा वर्धापन दिन नाही, तर देशसेवा, राष्ट्रवाद आणि विकासाच्या दृढ संकल्पांचा उत्सव आहे. भाजप पक्षाची स्थापना देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी झाली आहे.‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राने प्रेरित होऊन भाजप पक्षाने गेल्या अनेक वर्षांत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे कार्य केले आहे. भाजप पक्षाने नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले आहे. गरीब, शेतकरी, युवा, महिला आणि समाजातील वंचित घटक यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवून देशाला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशाला सक्षम, स्वावलंबी आणि शक्तिशाली बनवण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे, असे श्री. मांजरेकर म्हणाले. भाजप स्थापना दिना निमित्त मालवण तालुक्यात प्रत्येक बुथवर भाजप ध्वज फडकविण्यात आला तर तालुक्यात सदस्य नोंदणी तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.
















Subscribe to my channel




