नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा कांदळगावकरांवर जोरदार पलटवार; वैभव नाईकांच्या पाठपुराव्यामुळेच साडेनऊ कोटींचा निधी
मालवण : मालवण शहरातील भुयारी गटार योजनेसह विविध विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे शिवसेना नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भुयारी गटार योजनेचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच नगरपरिषदेला सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मालवण नगरपरिषदेत २००८-०९ मध्ये भुयारी गटार योजना मंजूर झाली होती. मात्र ठेकेदारांची अनुपलब्धता आणि निधीची कमतरता यामुळे अनेक वर्षे या योजनेचे काम अपूर्ण राहिले. २०१४-१५ मध्ये नगरपरिषदेने स्वनिधीतूनही या योजनेसाठी खर्च केला होता. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शिवसेना-भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्तेत आल्यानंतर तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली.
त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाच्या तत्कालीन प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश येऊन नगरपरिषदेला सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा थेट निधी मंजूर झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या योजनेतील केंद्राचा निधी बंद झाल्यानंतरही कामासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी वैभव नाईक यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याचे मयेकर यांनी सांगितले.
पुढील निधी उपलब्ध न झाल्यास यापूर्वी झालेल्या खर्चाचा विनियोग शून्य ठरण्याची शक्यता त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. यासंदर्भात प्रधान सचिवांच्या दालनात बैठकही झाली होती. या बैठकीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते. बैठकीचे इतिवृत्तही उपलब्ध असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी नवीन निविदा काढण्याची मागणी काही नगरसेवकांकडून होत असताना, तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जुन्याच ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्याचा आग्रह धरल्याचा आरोप मयेकर यांनी केला. अन्यथा संबंधित ठेकेदार न्यायालयात जाईल, अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आली होती. त्यामुळे ठेकेदाराला काम सुरू ठेवण्याची संधी देण्यात आली. त्यावेळचे नगरसेवक या घडामोडींचे साक्षीदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या योजनेसाठी तत्कालीन आमदार नारायण राणे आणि तत्कालीन खासदार निलेश राणे यांनाही केंद्र शासनाकडून एवढा निधी आणता आला नाही, असा टोला लगावत मयेकर यांनी वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याचे समर्थन केले.
नेत्यांना खूश करण्यासाठी कांदळगावकरांचा अजेंडा!
आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी महेश कांदळगावकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोपही मयेकर यांनी केला. वैभव नाईक यांनी चार वेळा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. याउलट कांदळगावकर यांना मालवणच्या जनतेत स्वतःचे ठोस जनमत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवता मागच्या दाराने सत्तेत येण्याचा मार्ग स्वीकारल्याची टीका मयेकर यांनी केली.
भुयारी गटार योजनेचा इतिहास, निधी मंजुरीसाठी झालेला पाठपुरावा आणि काम रखडण्यामागील जबाबदारी यावरून मालवणच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली असून, कांदळगावकर या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





Subscribe to my channel




