मालवण-कुडाळात नारळी पौर्णिमेचा जल्लोष : माजी आ. वैभव नाईकांची उपस्थिती

समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना; महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : समुद्राशी अतूट नाते सांगणाऱ्या नारळी पौर्णिमेचा उत्साह मालवण आणि कुडाळ तालुक्यात गुरुवारी ओसंडून वाहताना दिसला. पारंपरिक श्रद्धा, मच्छीमारांची समुद्रपूजा, महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धा, रिक्षा रॅली आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांनी संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. या विविध कार्यक्रमांना माजी आमदार तथा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती लावत नागरिक व मच्छीमारांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

नारळी पौर्णिमेनिमित्त वैभव नाईक यांनी समुद्राला विधिवत नारळ अर्पण केला. यावेळी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे संकटांपासून रक्षण व्हावे, त्यांच्या व्यवसायाला भरभराट मिळावी आणि त्यांच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. समुद्राशी जोडलेल्या कोकणातील मच्छीमारांच्या पारंपरिक श्रद्धेला यावेळी भावनिक स्पर्श मिळाला.

मालवण जेटीवर महिलांचा नारळ लढविणे स्पर्धेत जल्लोषशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण जेटीवर महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेने विशेष रंगत आणली. या स्पर्धेचे उद्घाटन वैभव नाईक, स्नेहा नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते झाले. महिलांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतल्याने जेटी परिसरात चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

यानंतर वैभव नाईक यांनी लायन्स क्लबच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेलाही त्यांनी भेट देत सहभागी महिला आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

कुडाळात रिक्षा रॅली; भंगसाळ नदीत मानाचा नारळ

कुडाळात दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित रिक्षा सेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, रिक्षांची रॅली आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, संपर्कप्रमुख अतुल बंगे यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि रिक्षा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवणमध्येही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, ज्येष्ठ शिवसैनिक व उद्योजक नितीन वाळके, सामाजिक कार्यकर्ते बंड्या सरमळकर, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगुत, नगरसेविका अनिता गिरकर, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, महेश जावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, उपतालुकाप्रमुख रश्मी परुळेकर, शहर संघटक राधिका मोंडकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मालवण-कुडाळमध्ये समुद्रपूजा, पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धा, कबड्डी आणि रिक्षा रॅली अशा विविध उपक्रमांनी उत्सवाला बहार आणली. श्रद्धा, परंपरा, मच्छीमार संस्कृती आणि सामाजिक एकोपा यांचा सुरेख संगम घडवत यंदाची नारळी पौर्णिमा परिसरात उत्साहात साजरी झाली.

error: Content is protected !!