रस्त्यावरील खड्डे आणि अवास्तव आश्वासनामुळे वैभव नाईक यांचा पराभव अटळ !
भाजपचे विभागीय अध्यक्ष चेतन मुसळेंची टीका ; हॅट्ट्रिकच्या गोष्टी करायला हा क्रिकेटचा खेळ नाही
येत्या निवडणूकीत शिवसेनेकडून उमेदवार म्हणून कोणा खासदार पुत्रीचं नाव आल्यास आश्चर्य नको
कुणाल मांजरेकर
मतदार संघातील रस्त्यावरील खड्डे आणि अवास्तव आश्वासनामुळे आमदार वैभव नाईक यांचा आगामी निवडणूकीत पराभव होणार हे अटळ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे सुकळवाड विभागीय अध्यक्ष चेतन मुसळे यांनी व्यक्त केली आहे. हॅट्ट्रिक करण्यासाठी हा क्रिकेटचा खेळ नाही. आमदार वैभव नाईक शिवसेनेतून हॅट्ट्रिक करून निवडून येणार हे सांगण्यापूर्वी मुळात ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढविणार, ते त्यांना विचारून ठेवा. येत्या आमदारकीच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून कोणा खासदार पुत्रीचं नाव आलं तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला देखील श्री. मुसळे यांनी लगावला आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेला चेतन मुसळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुळात पुढील विधानसभेला वैभव नाईक यांचे नाव निश्चित आहे का ? असा सवाल करून मागच्या वेळीच त्यांचे नावं तिसऱ्या टप्प्यातील यादीत जाहीर झालं होतं, याची आठवण त्यांनी करून दिली. मालवण – कुडाळ मधील बरेच शिवसैनिक गेले अनेक दिवस भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत. कित्येक शिवसैनिक पक्षत्यागाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हरी खोबरेकर यांनी आपण परत जिल्हा परिषद निवडणूक लढवली तर निवडून येऊ का ? याचा विचार करावा. मागील दोन ते अडीच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. निलेश राणेंचा विचार करण्यापेक्षा अगोदर मालवण तालुक्यातुन येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीतुन शिवसेनेच्या किती सीट निवडुन येतील आणि कोणत्या पक्षाचा आधार घेणार हे सुध्दा ज्योतिषी असलेल्या हरी खोबरेकर यांनी जाहीर करावे. आता खोबरेकर यांची शिवसेना तालुकाप्रमुख पदाची कारकीर्द जवळपास संपत आलेली आहे. त्यामुळे तालुकाप्रमुख पद टिकवण्यासाठी खोबरेकर यांची शेवटची धडपड सुरू असल्याची टीकाही श्री. मुसळे यांनी केली.