तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी

१२ ते १५ लाखांचे नुकसान; पंचनामा पूर्ण करून अर्थसाहाय्यासाठी कार्यवाही सुरू

मंत्री नितेश राणे यांचे नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने मदत देण्याचे निर्देश

मालवण | प्रतिनिधी

तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून, मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा पूर्ण केला आहे. नुकसानग्रस्त नौकामालकाला शासकीय अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बाधित मच्छीमारांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री तारकर्ली येथे रापण नौका ठेवण्याच्या शेडला आग लागली. या दुर्घटनेत पारंपरिक रापण नौका पूर्णपणे जळून खाक झाली. मासेमारीचे साहित्य आणि संपूर्ण शेडही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. नौकामालक गुंडू जानू कांदळगावकर यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, मच्छीमारांच्या तत्परतेमुळे शेडमधील दुसरी नौका सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांनीही नौकामालकाशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. लागू असलेल्या शासकीय योजना व नियमांनुसार नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

रापण मासेमारी हा कोकणातील पारंपरिक सामूहिक व्यवसाय असून, त्यावर सुमारे ५० ते १०० मच्छीमारांची उपजीविका अवलंबून असते. नौका आणि मासेमारी साहित्य जळाल्याने अनेक कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाधित मच्छीमारांना पुन्हा मासेमारी सुरू करता यावी, यासाठी शासकीय अर्थसाहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे. नुकसानग्रस्त मच्छीमारांना नियमानुसार शक्य ती सर्व मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग प्रयत्नशील असून, मंत्री नितेश राणे यांनीही या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

error: Content is protected !!