
देऊळवाडा, देवबाग परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा आणि देवबाग परिसरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
देऊळवाडा परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, याबाबत PWD विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती PWD मार्फत केली जाईल, असे विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे मनसेने म्हटले आहे.
देवबाग परिसरातील रस्त्यांवर केवळ पावडर व खडी टाकून ठेवण्यात आल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मालवण हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, शहरात प्रवेश करताना पर्यटकांच्या निदर्शनास येणाऱ्या रस्त्यांची अशी दुरवस्था मालवणच्या प्रतिमेसाठी योग्य नसल्याचे मनसेने नमूद केले आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर २०२६ रोजी PWD कार्यालयात भेट देण्यासाठी गेलो असता संबंधित अधिकारी मुंबई येथे शासकीय कामानिमित्त असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिकारी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने म्हटले आहे.
PWDच्या अखत्यारीतील मालवण तालुक्यातील खराब रस्त्यांची तातडीने पाहणी करून दोन कार्यदिवसांत दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी स्पष्ट मागणी मनसेने केली आहे. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भविष्यात गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.







Subscribe to my channel






