अमित ठाकरेंनी पुण्यात मोदींचा फोटो उतरवला ; मनसे विरुद्ध भाजप सामना रंगला

पुणे : पुण्यात आज मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या एका कृतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनला भेट दिलेल्या अमित ठाकरे यांनी वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या शेजारी लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरवण्यास सांगितला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच एका विद्यार्थ्याने कार्यालयातील फोटो अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला. फोटो पाहताच अमित ठाकरे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. “छत्रपती शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो कशाला?” असा सवाल करत त्यांनी मुख्याध्यापकांकडे नाराजी व्यक्त केली आणि मनसे कार्यकर्त्यांना संबंधित फोटो खाली उतरवण्यास सांगितले.

“शिवराय-बाबासाहेबांशी मोदींची तुलना होऊ शकत नाही!”

या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. “मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेवू नका. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले. शासकीय महाविद्यालयात प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचा फोटो लावायचा असल्यास तो स्वतंत्र ठिकाणी लावावा, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. “तुम्ही उद्या देवघरात मोदींचा फोटो लावाल का?” असा थेट सवालही अमित ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी केवळ फोटोच्या मुद्द्यावरच प्रशासनाला धारेवर धरले नाही, तर कँटीनमधील निकृष्ट जेवण आणि स्पोर्ट्स कोट्यात प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरूनही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

भाजपचा पलटवार : “तो मोदींचा फोटो नाही, पंतप्रधानांचा आहे!”

अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. पुणे भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी थेट पलटवार करत, “तो फोटो नरेंद्र मोदींचा नसून भारताच्या पंतप्रधानांचा आहे. प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यालयात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे फोटो लावणे बंधनकारक असते. अमित ठाकरेंना प्रोटोकॉल माहिती नसेल,” अशी टीका केली. या वादानंतर महाविद्यालय प्रशासनाने संबंधित फोटो पुन्हा जागेवर लावल्याची माहिती आहे.

फोटो उतरवण्याच्या वादातून गुन्ह्याची प्रक्रिया

दरम्यान, महाविद्यालयात विनापरवाना प्रवेश करून गोंधळ घातल्याचा आरोप तसेच फोटो काढण्याच्या प्रकरणावरून अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसे कार्यकर्त्यांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र कारवाईची शक्यता निर्माण होताच अमित ठाकरे यांनीही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. “शिवरायांसाठी दुसरा गुन्हाही चालेल!” या त्यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी धार आली आहे.

पुण्यात मनसेचा ‘Gen-Z’ कनेक्ट; पहिल्याच फेरीत वादाची ठिणगी

अमित ठाकरे सध्या पुण्यातील सात महाविद्यालयांना भेटी देत असून Gen-Z विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या या दौऱ्याच्या पहिल्याच टप्प्यात शिवरायांच्या शेजारी पंतप्रधानांच्या फोटोवरून मनसे आणि भाजप आमनेसामने आल्याने पुण्याच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. फोटो पुन्हा लावला गेला असला, तरी अमित ठाकरेंची भूमिका आणि भाजपचा पलटवार यामुळे हा फोटो-विवाद आता राजकीय संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे.

error: Content is protected !!