ग्रामउद्योग क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करूया

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांचे आवाहनात्मक प्रतिपादन ; चेंबर ऑफ कॉमर्सचा ‘गाव तिथे उद्योजक’ संकल्प 

देवगड : महाराष्ट्रात हरितक्रांती नंतर धवलक्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. शैक्षणिक क्रांतीनंतर आता ग्रामउद्योग क्रांतीची सुरुवात होत आहे. ग्रामउद्योग क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करूया. यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने ‘गाव तिथे उद्योजक’ संकल्प केलेला आहे. या संकल्पानुसार महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते चार वर्षांत ३६ हजार उद्योजक तयार होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी देवगड येथे आयोजित व्यापारी एकता मेळाव्यात केले.

देवगड तालुका व्यापारी संघांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा देवगडमधील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व अ‍ॅप्लॉईड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे चेअरमन रामभाऊ भोगले, आय-४१ इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक महेश चव्हाण, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, उपाध्यक्ष संजय भोगटे, सागर शिरसाट, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर, स्वागताध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सचिव संजय मेस्त्री, देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे तसेच इतर तालुक्यातील व्यापारी संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागताध्यक्ष सुरेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष रविंद्र माणगावे म्हणाले, ‘गाव तिथे उद्योजक’ ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची संकल्पना असून तिची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी काळानुसार बदल स्वीकारणे गरजेचे आहे. ऑनलाईन व्यापाराच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑनलाईन विक्री आणि बल्क खरेदीसारखे पर्याय स्वीकारावेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले यांनी मूल्याधिष्ठित व्यापार दीर्घकाळ टिकतो, असे नमूद केले. युवकांची बदलती विचारसरणी लक्षात घेऊन जुन्या पिढीने नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती स्वीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक व्यापाऱ्यांनी आधुनिकीकरण केल्यास मोठ्या कंपन्यांशी सक्षम स्पर्धा करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योजक अविनाश पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉजिस्टिक, पर्यटनपूरक आणि पर्यावरणपूरक उद्योगांसाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. व्यापारी महासंघासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उभारण्याची गरज व्यक्त करत शासनाकडून जागा उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारणीवर व्यापाऱ्यांनी भर द्यावा, असेही ते म्हणाले.

महिला तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी व्यापार क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग अधोरेखित केला. महिला उद्योजक सक्षमपणे पुढे येत असून संघटित प्रयत्नातून व्यापारी क्षेत्र अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना सातत्याने सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सरचिटणीस नितीन वाळके यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा दिला. स्वतंत्र सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळी पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आर्थिक फसवणूक आणि खोट्या नोटिसांविरोधात महासंघ सक्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्नसुरक्षा परवाना नूतनीकरणासाठी विशेष मोहीम, प्रशिक्षण कार्यशाळा आणि त्रिस्तरीय नवी संघटनात्मक रचना लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीसाठी एक कोटी रुपयांचा सहाय्यता निधी उभारण्याची योजनाही जाहीर करण्यात आली.

देवगड तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांनी जिल्हा व्यापारी संघाचे सदस्यत्व स्वीकारण्यात देवगड तालुक्यातील व्यापाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. देवगड तालुक्यात व्यापारी पर्यटन संस्थेची प्रथम स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या मेळाव्याला पर्यटनाची जोड देत देवगड पर्यटन समितीच्या वतीने ‘फिश फूड अँड फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते.

देवगड व्यापारी संघटनेने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून महावितरणशी सर्व व्यापाऱ्यांची कनेक्टिव्हिटी निर्माण केल्यामुळे त्याचा फायदा हॉटेल व्यवसाय, कोल्ड्रिंक्स विक्रेते तसेच इतर व्यावसायिकांना होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या काळात व्यापारी वर्गाला ऑनलाईन संस्कृतीला सामोरे जावे लागत असून, लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी ऑनलाईन माध्यमातून जोडले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या यशामध्ये टीमवर्क अत्यंत महत्त्वाचे असून त्याला देवगड व्यापारी संघाने प्रथम प्राधान्य दिल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील १०० वर्षे पूर्ण केलेल्या आस्थापनांचा सन्मान करण्याची परंपरा देवगडमधूनच सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यापारी महासंघाच्या आपल्या कारकीर्दीतील उपक्रमांचा आढावा घेत महासंघ प्रगतीपथावर असल्याचा अभिमान व्यक्त केला व मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आदर्श पर्यटन उद्योजक पुरस्कार श्रीकांत जोईल व वैष्णवी जोईल यांना देण्यात आला. आदर्श व्यापारी व शेतकरी पुरस्कार प्रसन्न गोगटे यांना प्रदान करण्यात आला. जिल्हा व्यापारी महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यापारी राजाराम कदम यांना बहाल करण्यात आला. कै. माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार श्रीमती सुषमा सदानंद देसाई यांना देण्यात आला. कै. भाईसाहेब भोगले स्मृती पहिल्या पिढीचा युवा उद्योजक पुरस्कार विजय उर्फ बंटी प्रमोद कदम यांना प्रदान करण्यात आला. कै. बापू नाईक स्मृती पर्यटन व सेवा उद्योग पुरस्कार कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे (दोडामार्ग) यांना देण्यात आला. उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार मालवणचे उमेश नेरुरकर यांना बहाल करण्यात आला.

उद्घाटनापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल मेळाव्याच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि जिल्ह्यातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुबल व सौ. विद्या माणगांवकर यांनी केले.

छायाचित्रे – वैभव केळकर

error: Content is protected !!