… तर मालवण शहरातील भुयारी गटारच्या ठेकेदाराचा मक्ता रद्द करणार
आमदार वैभव नाईक यांचा इशारा : योजनेच्या दिरंगाईबाबत नाराजी
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. संबंधित ठेकेदाराकडून योजनेचे काम पूर्ण करण्यास दिरंगाई होत असल्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ठेकेदाराने या योजनेच्या एका टप्प्याची चाचणी करून देण्याची ग्वाही दिली असून विहित मुदतीत ही चाचणी करून न दिल्यास संबंधित ठेकेदाराकडून हे काम काढून घेण्यात येणार असल्याचा इशारा आ. नाईक यांनी दिला. भुयारी गटार योजनेचे ११ कोटी रुपये नगरपालिकेकडे प्राप्त आहेत. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया करून सदरील काम पूर्ण करून घेतले जाईल, असे ते म्हणाले.
मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम म्हणजे शहरवासीयांची डोकेदुखी ठरली आहे. गेली अनेक वर्षे हे काम सुरू असून सदरील काम पूर्ण करण्यात ठेकेदाराला यश आलेले नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून भुयारी गटार योजनेसाठी निधी प्राप्त होत असतानाही हे काम पूर्ण करण्यात ठेकेदाराला अपयश आल्याने आमदार वैभव नाईक यांनी या ठेकेदाराची नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यावर योजनेचे काम सुरू असून झालेल्या कामाची चाचणी करून देण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही चाचणी करून न दिल्यास हा ठेका रद्द करण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
दरम्यान, या ठेकेदाराला कोणतीही अतिरिक्त रक्कम पालिकेने अदा केली नसून झालेल्या कामाचेच बील अदा करण्यात आले आहे. शिवाय त्याचे दीड ते दोन कोटी रुपये पालिकेकडे असल्याची माहिती मंदार केणी यांनी यावेळी दिली.