सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा; बांदा पंचक्रोशी संस्था जिल्ह्यात अव्वल

जिल्ह्यातील अव्वल दूध संस्थांचा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दुग्ध मेळाव्यात गौरव होणार – अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी आणि दूध संस्थांना बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आयोजित केलेल्या ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँक मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा निकाल जाहीर केला. यावेळी बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, संचालिका सौ. निता राणे, संचालक रवींद्र मडगावकर, महेश सारंग, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.

१४१ पैकी ३० संस्थांचा सहभाग

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १४१ दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. संस्थेचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहारांचा वापर, दूध संकलनातील वाढ, सभासदांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. ३० ऑगस्ट २०२६ अखेर ३० संस्थांनी यासाठी आपले प्रस्ताव सादर केले होते.

पुरस्कार प्राप्त संस्था अशा

प्रथम क्रमांक : ५० हजार रुपयेबांदा पंचक्रोशी सह. दुग्ध व्याव. संस्था मर्या., बांदा (ता. सावंतवाडी), द्वितीय क्रमांक : ३० हजार रुपये (विभागून)१. इन्सुली सह. दुग्ध संस्था, इन्सुली (ता. सावंतवाडी)२. श्री देवी माऊली सह. दुग्ध संस्था, मडुरा (ता. सावंतवाडी) तृतीय क्रमांक : २० हजार रुपये (विभागून)१. मयूर दुग्ध संस्था, घावनळे (ता. कुडाळ)२. यशोदा दुग्ध संस्था, वर्दे (ता. कुडाळ) उत्तेजनार्थ पुरस्कार : १० हजार रुपये श्री सातेरी प्रासादिक विकास संस्था, वेतोरे (ता. वेंगुर्ला).

“जिल्ह्याबाहेरून जनावरे खरेदी केल्यामुळे जिल्ह्याच्या दूध उत्पादनात नक्कीच वाढ होईल. आज पुरस्कार मिळालेल्या सर्व संस्थांचे अभिनंदन. पुढील वर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दूध संस्थांनी सहभाग घ्यावा,” असे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी केले.

सर्व विजेत्या संस्थांना ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय भव्य दुग्ध मेळाव्यात संस्थेच्या गरजेनुसार साहित्य / वस्तू स्वरूपात आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!