खिशात सापडली चिठ्ठी; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
सावंतवाडी : चराठा टेंबवाडी येथील परेश उमेश तांबोसकर (वय २४) या तरुणाने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परेश हा घरातील खोलीत झोपला होता. तो उशिरापर्यंत बाहेर न आल्याने गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याच्या चुलत भावाने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले. त्यावेळी परेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने गावातील खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, परेशच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात आपण स्वतः जीवन संपवत असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील करीत आहेत.