सर्वोच्च न्यायालयात उद्या शिंदे गटाचाच विजय होणार : राणेंना विश्वास
शिंदे गटाचे सर्व निर्णय कायदेशीर सल्ला घेऊनच : सिंधुदुर्गच्या मंत्री पदांबाबत एक-दोन दिवसांत उत्तर मिळेल
सी वर्ल्डसह बंद पडलेले प्रकल्प लवकरच सुरू करणार : नारायण राणेंची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यातील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (सोमवारी) सुनावणी होणार आहे. ही न्यायालयीन बाब असल्याने यावर जास्त भाष्य करणे उचित ठरणार नाही. पण शिंदे गटाने आजपर्यंतचे सर्व निर्णय कायदेशीर सल्ले घेऊनच घेतले आहेत. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचाच विजय होईल, असा विश्वास भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मालवणात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम मालवण येथील निलरत्न निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ना. राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिंदे- भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन मंत्री पदे मिळणार का ? असा सवाल केला असता काही गोष्टींवर आता भाष्य करणे अनुचित असून या प्रश्नाचे उत्तर एक- दोन दिवसांत मिळेल, असे ते म्हणाले.
शिंदे- भाजपा सरकार किमान साडेसात वर्षे टिकेल
शरद पवारांनी राज्यातील शिंदे- भाजपा सरकार महिन्यात कोसळेल, असे म्हटले आहे. पवार साहेब जे बोलतात, त्याच्या नेमके उलट घडते, हा इतिहास आहे. त्यामुळे शिंदे- भाजपा सरकार उर्वरित अडीच वर्षे आणि पुढील पाच वर्षे म्हणजे साडेसात वर्षे कार्यकाल पूर्ण करील, असे नारायण राणे म्हणाले.
सिंधुदुर्गात माझ्या कालावधीत मंजूर झालेल्या कामा व्यतिरिक्त एकही नवीन काम येथील लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत. येथील आमदाराला कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या कामा व्यतिरिक्त कोणत्याही कामात रस नाही. त्यामुळेच इकडचा विकास ठप्प झाला असून सी वर्ल्ड प्रकल्पासह येथील बंद पडलेली विकास कामे आम्ही लवकरच सुरू करणार, असे नारायण राणे म्हणाले.