विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला गणिताची जोड; भोसले सैनिक स्कूलमध्ये मॅथ्स मॉडेल मेकिंग स्पर्धा

सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विश्लेषणात्मक कौशल्ये तसेच गणिताचा दैनंदिन जीवनातील व्यावहारिक वापर विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गणितीय संकल्पनांवर आधारित आकर्षक मॉडेल्स तयार करून त्यांचे सादरीकरण केले. परीक्षकांनी मॉडेलची संकल्पना, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे देत आपल्या आकलन क्षमतेचे आणि व्यावहारिक ज्ञानाचे दर्शन घडविले.

वायबीआयटीचे अधिव्याख्याता संजोग ओळकर आणि कविता वालावलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी नववीतील प्रथमेश कानविंदे आणि सहावीतील आराध्या मुंडये यांनी दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व विशद केले. परीक्षकांनी गणिताचे शैक्षणिक महत्त्व तसेच विविध क्षेत्रांतील त्याच्या उपयुक्ततेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीतील मिनिष्का कुमार आणि लिसा फर्नांडिस यांनी केले, तर नववीतील अनुष्का गावडे हिने आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका प्रियंका देसाई आणि उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक उपस्थित होत्या.कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताकडे अधिक जिज्ञासेने आणि सर्जनशील दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली.

error: Content is protected !!