
पोईप, पोयरे, नारिंग्रे येथे पिकांची पाहणी ; भातपिके, विहिरींच्या पाणीपातळीचा घेतला आढावा, नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार
सिंधुदुर्ग : पावसातील मोठा खंड आणि त्यानंतरच्या तीव्र उष्णतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये भातासह अन्य शेतीपिकांवर संकट निर्माण झाले आहे. पिकांची वाढ खुंटण्यासोबतच विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत असल्याने प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
मालवण तालुक्यातील पोईप तसेच देवगड तालुक्यातील पोयरे आणि नारिंग्रे येथे त्यांनी शेतांमध्ये जाऊन भातपिकांची सद्यस्थिती, पिकांची वाढ, उपलब्ध पाणी आणि पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.भातपिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. काही भागांमध्ये पिके करपण्याच्या स्थितीत असून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
विहिरींची पाणीपातळीही तपासली
शेतीसाठी उपलब्ध पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीचीही पाहणी केली. पावसाअभावी जलस्रोतांवर निर्माण होणारा संभाव्य ताण, सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसेच आगामी काळातील पाण्याची गरज याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
“परिस्थितीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार”
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पर्जन्यमान, शेतीपिकांची स्थिती, जलस्रोत आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे सांगितले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे शासनाकडे मागणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण गणेश लव्हे, प्रभारी तहसीलदार देवगड संतोष खरात, मंडल अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते. पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण झालेल्या शेतीच्या संकटावर प्रशासनाची नजर असून, जिल्ह्यातील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.







Subscribe to my channel






