संजय राऊतची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत !
भाजपा नेते निलेश राणे यांची टीका ; संजय राऊतांच्या घरासमोरील लोकं भाड्याची
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची ईडीचौकशी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १८०० कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत ही चौकशी सुरू असून याची उत्तरे संजय राऊत याना द्यावीच लागतील. त्यामुळे घराबाहेर भाड्याची माणसे आणून संजय राऊत यांनी तपासात व्यत्यय आणू नये. जर धुमाकूळ घालायचा प्रयत्न केला तर जेलमध्ये बसून जेलर बरोबर तुम्हाला मुलाखत घ्यावी लागेल, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
याबाबत त्यांनी म्हटले आहे की, पत्राचाळ हा १२०० कोटींचा घोटाळा आहे. त्या घोटाळ्यात ज्या पार्ट्या आहेत, त्यामध्ये संजय राऊत सुद्धा आहे. पण त्यांनी चौकशीला सहकार्य करायचं नाही असं ठरवलं म्हणून ईडीचे अधिकारी घरी पोचले. हा माणूस जर घराच्या बाहेर येऊन सहकार्य करीत नसेल तर माणूस कुठे जाणार ?
जर १२०० कोटींचा घोटाळा झाला असेल तर संजय राउतला उत्तरं दयावीच लागणार. जे ब्रिटिश भारतातून गेले ते काय संजय राऊतच्या नावाने पत्र सोडून गेले का की हा आमचा बाब्या आहे, याच्यावर कसली कारवाई होता नये. याने अश्लील चाळे केले तरी चालतील, महिलांना शिव्या घातल्या तरी चालतील, कुठेही धुमाकूळ घातला तरी चालेल, असं प्रमाणपत्र आहे की काय संजय राऊतच्या नावाचं ? संजय राऊतने नाटकं करणं बंद करावं, जी भाड्याची लोकं घोषणा द्यायला घराबाहेर उभी केलीत, ती पोलिसांचे बांबू पडतील तेव्हा संध्याकाळपर्यंत संजय राऊतचं नाव काढणार नाही. जास्त नाटक करू नका, जी चौकशी होतेय त्यामध्ये सहकार्य करा. तरच तुम्हाला मार्ग निघू शकतो. उगाचच जर धुमाकूळ घालायचा प्रयत्न केला तर जेलमध्ये बसून जेलर बरोबर तुम्हाला तुमची मुलाखत घ्यावी लागेल, दुसरा पर्याय उरला नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.