डॉ. शिल्पा झाटये यांचा कवितांतून जीवनमूल्यांचा संस्कार…

श्री रेकोबा विद्यालयात विद्यार्थ्यांना एकाग्रता व अभ्यासाचे धडे

मालवण : अभ्यासात यश मिळविण्यासाठी केवळ मेहनत नव्हे, तर योग्य नियोजन, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात कवयित्री व लेखिका डॉ. सौ. शिल्पा अविनाश झांट्ये यांनी विद्यार्थ्यांना ‘एकाग्रता आणि अभ्यासाची मूलतत्त्वे’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.

अभ्यास करताना मनाची एकाग्रता कशी वाढवावी, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, अभ्यासातील अडथळे कसे दूर करावेत आणि अभ्यासाची प्रभावी पद्धत कोणती असावी, याबाबत डॉ. झांट्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपयुक्त टिप्स दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.

यावेळी त्यांनी आपल्या ‘Garland of Words’ या पुस्तकाची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या कवितांमधून जीवनातील मूल्ये, संवेदनशीलता, माणुसकी आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले. पुस्तकातील साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमात कु. वेदिका परशुराम लुडबे आणि कु. हिना निलेश चव्हाण या विद्यार्थिनींनी त्यांच्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय खोचरे, ‘Garland of Words’ पुस्तकाचे मराठी अनुवादक श्री. गुरुनाथ राणे, श्री. फणसेकर सर, श्री. कुबल सर, सौ. शेरलेकर मॅडम, सौ. टेंबुलकर मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. मिताली मोंडकर मॅडम यांनी केले. अभ्यासासोबतच साहित्य, वाचन आणि जीवनमूल्यांची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

error: Content is protected !!