… जत्रोत्सव मालवणचा ! माझ्या रामेश्वराचा !!
मालवण.. छत्रपतींच्या आगमनाने वसलेलं मालवण, किल्ले सिंधुदुर्गचा वारसा सांगणारे मालवण, श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायणाचे मालवण ! मालवणचा समृद्ध वारसा वैभवशाली बनवणारा दिवस बलिप्रतिपदा ! बलिप्रतिपदेच्या दिवशी ग्रामदेवतांची पालखी नगरप्रदक्षिणेला निघते आणि अवघ्या मालवण शहराचे देऊळ होऊन जाते !!
ढोलावर बसणारी काठी, तारसप्तकात गेलेला तो आवाज, पेट्रोमॅक्स घेऊन चाललेली ती बाई… प्रचंड गर्दी असूनही शांत आणि शिस्तबद्ध चालणारी ती माणसे… फटाक्याची आतषबाजी, सजलेली बाजारपेठं आणि हे सारे वैभव देणारा आणि शांतपणे पालखीत बसून न्याहाळणारा माझा देव श्री देव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण..
मालवणचा हा पालखी सोहळा पंरपरेने बलीप्रतिपदेच्या दिवशी पार पडतो. दुपारी दोनच्या सुमारास धार्मीक सोहळा पार पाडला की श्री देव पालखीत विराजमान होतात. ती गोंड्याची पालखी, त्यात विराजमान झालेले श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण.. दहा बारा किलोमिटरची ती शहरप्रदक्षिणा अनवट असते.
मंदिरातन पालखी उचलली कि, आभाळात डौलाने उभे असलेले देऊळवाड्याचे माड-पोफळी फितूर होतात.. आणि त्याना त्या फितूरीत साथ देतो तो वारा.. देऊळवाड्यापासून बेभान झालेला वारा, अष्टदिशेला उधळतो.. मराळवाड्याच्या सातेरीला साद घालतो, मोरयाच्या धोंड्याच्या वाळूसमोर बेभान होऊन नाचतो, मेढ्यातल्या काळबादेवी समोर झावळ्याआडून इशारा करतो, कोळंबचा खापरेश्वर आणि आ़डारीच्या गणपतीला वंदन करतो आणि जणू वेड लागल्यासारखा सांगत फिरतो… देव निघालो ,चला पालखी चला पालखी इली…..
देऊळवाड्यातून पालखी निघते ती थेट भुतनाथाच्या मंदिरात.. भुतनाथ दर्शन सोहळा झाल्य़ानंतर पुढची भेट ऐतिहासिक स्थळावर. होय त्याच जागेवर , ज्या जागेवर महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने वाळूत एका खडकात चंद्र सूर्य, गणेश,नंदी कोरुन अवघ्या समुद्रालाच पालाण घातलं तीच जागा.. मोरयाचा धोंडा..खरतर वर्षभर सूर्याचा प्रखर मारा आणि दर्याचा खारा वारा झेलत वाळूचे कण शब्दशाहा झिजत असतात, त्याच वाळूचं आज पालखी आल्यावर रुपडं पालटतं.. ती चंदेरी होती.. कारण तिच्या देहावरुन नगरीचे ग्रामदैवत जाणार असते.. मोरेश्वराची भेट झाल्यानंतर पालखी निघते ती काळबादेवीच्या दर्शनाला..
काळबादेवीची भेट झाल्यावर मग पालखी येते ती बाजारपेठेत.. सोमवार बाजारपेठेत रामेश्वर मांडावर श्रीदेव विराजमान होतात.. गर्दीला उधाण आलेले असते आणि त्या उधाणाला एक शिस्तही… सारा बाजार सजलेला असतो.. रामेश्वर मांडावर लागलेली शिस्तबद्ध रीघ असो किंवा बाजारात उडालेली झुंबड असो.. हा संपूर्ण सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतो..
वर्षानुवर्षांची ही परंपरा ! अगदी कोरोना काळातही जेव्हा सगळी देवालय बंद होती तेव्हाही मालवणवासीय आणि पालखी सोहळा हे नाते अतूट राहिले. बाकी ठिकाणी देवाला भेटायला भक्तांना जावे लागते .. पण मालवण हे एकमेव ठिकाण आहे जिथे देव भक्तांना भेटायला, त्यांचा व्यापार उदीम वाढवायला, आपल्या नगरला स्वतः भेट देऊन मी ठामपणे आहे हा विश्वास देतो.. याच विश्वासाची आणि दरवर्षी आतुरतेने वाट पाहणाऱ्या या पालखी सोहळ्याची ही गोष्ट प्रत्येकाला एक नवा विश्वास देतेय !! माझा देव माझ्यासोबत आहे.. तो मला दरवर्षी भेटायला येतो !
संग्रहित छायाचित्रे – समीर म्हाडगूत, मालवण