सावंतवाडीत २४ ऑगस्टला ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ

आ. प्रमोद जठार, संतोष साखरे स्वीकारणार निवेदने; रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान

सावंतवाडी : नागरिकांच्या प्रलंबित समस्या आणि विविध शासकीय कामांना गती देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी येथील बॅनर्जी नाथ पै व्यासपीठ सेवा अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची तसेच प्रलंबित कामांसंदर्भात निवेदने सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांबाबतची निवेदने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नावाने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभागाचे संयोजक तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री. प्रमोद जठार आणि श्री. संतोष साखरे नागरिकांची निवेदने स्वीकारणार असून, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करून संबंधित कामांना गती देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या परिसरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना, प्रशासकीय कामे तसेच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह निवेदने सादर करावीत आणि या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!