मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘संस्कार सभागृह’ मालवण येथे पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदीवे, सरचिटणीस काका कुडाळकर, सरचिटणीस बबन हळदीवे, खजिनदार बबन परब यांच्यासह अन्य जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटू सदस्य उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटूना स्पर्धा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी आणि त्याहेतूने ज्येष्ठ खेळाडूंचे स्नेहसंमेलन अशी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेमागील संकल्पना असली तरीही मागील वर्षापासून असोसिएशच्या वतीने मुलांच्या विविध वयोगटांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात यत आहे आणि यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका हौशी क्रिकेट असोसिएशचे सहकार्य मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनच्या वतीने प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी ‘सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग’ या नावाने टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र या सर्वसाधारण सभेत या नावावर चर्चा होऊन आता यापुढे या स्पर्धेला ‘सिंधुदुर्ग हौशी प्रीमिअर लीग’ (SHPL) हे नाव देण्याच्या सुचनेला उपस्थित सर्व सदस्यांनी संमती दर्शविली. या वर्षी ही स्पर्धा कणकवली येथे कणकवली असोसिएशच्या आयोजनाखाली होणार आहे. त्यानंतर वयोगट १४, १६, १९ वर्षे मुलांसाठी ५ दिवसांचे लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबीर मालवण येथील बोर्डीग ग्राऊंड येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
वेंगुर्ला मैदान येथे १६ वर्षांखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी होणारी ४५ वर्षांवरील जिल्ह्यातील तालुका संघ टेनिस क्रिकेट स्पर्धा सावंतवाडी येथे तर ४५ वर्षांवरील जिल्ह्यातील तालुका संघ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात येत आहे. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू तथा मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांना कोकण साहित्य परिषदेचा ‘कविता राजधानी २०२५’ पुरस्कार जाहीर झाला आहे हे आपल्या अभिमानास्पद असून श्री. पिंटो यांचा आपल्या सर्वांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात यावा अशी सूचना अध्यक्ष अनिल हळदीवे यांनी मांडल्याचे सरचिटणीस काका कुडाळकर म्हणाले. यावेळी श्री.पिंटो यांचे असोसिएनशच्या वतीने अध्यक्ष अनिल हळदीवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेला संबोधित करताना असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदीवे म्हणाले, ‘संघटनेला ५ वर्षे पूर्ण झाली. पाहिलेले स्वप्न यशस्वी झाल्याचे पाहून समाधान वाटत आहे. ही संघटना म्हणजे असे एक दुर्मिळ उदाहरण आहे यामध्ये राजकीय हाडवैरी, व्यावसायिक हाडवैरी कधीही एकत्र येत नाहीत असा माझा अनुभव आहे मात्र आपल्या संघटनेत सर्व क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले आहेत’.
ज्येष्ठ क्रिकेटपटू महेश कांदळगावकर म्हणाले, ‘ज्येष्ठ क्रिकेट खेळाडूंनी विरंगुळा म्हणून निर्माण केलेली संघटना आता मुलांसाठीसुद्धा लेदर क्रिकेट स्पर्धा, प्रशिक्षण शिबीर आयोजित करत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापुढे क्रिकेट व्यतिरिक्त काही सामाजिक उपक्रम सुद्धा सुरु करूया. किमान दोन किंवा एकतरी उच्च दर्जाचा क्रिकेटपटू घडवूया’.
















Subscribe to my channel




