स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अनुदानित विज्ञान विभागास शासन मान्यता
मालवण : येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाच्या स. का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात किरण ठाकूर, बेळगाव यांच्या देणगीतून सुरू करण्यात आलेल्या विज्ञान विभागाला अनुदानित विज्ञान महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे.
या विभागाला विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती. गेली ६ वर्षे हे महाविद्यालय विनाअनुदानित तत्वावर चालविण्यात येत होते. तालुक्यातील एकमेव विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय या निकषावर २६ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार महाविद्यालयाच्या या विज्ञान विभागाला अनुदानित विज्ञान महाविद्यालय म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. विज्ञान विभागाच्या वतीने रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, प्राणी शास्त्र, गणित आणि वनस्पती शास्त्र ह्या विषयांच्या पदवी स्तराचे अभ्यासक्रम चालवले जातात. अनेक वर्षे मालवण तालुक्यात अनुदानित विज्ञान महाविद्यालयाची उणीव प्रकर्षाने भासत होती. ती उणीव आता भरून निघाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुका परिसरातील बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सर्व विश्वस्त आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी केले आहे. विद्यमान विश्वस्त मंडळाने त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.