पक्षसंघटना खिळखिळीत करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही ; खा. विनायक राऊतांचा शिवसेनेतील नाराजांना इशारा
संपूर्ण शिवसेना महेश कांदळकर यांच्या पाठीशी
मालवण शहर शिवसेना कार्यकारणीत बदल होणार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी दुपारी महेश कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून आगामी नगरपालिका निवडणूक महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले. पक्ष संघटना खिळखिळीत करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही अशा शब्दात शिवसेनेतील नाराजांना त्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, येत्या १५ दिवसात शहर शिवसेनेत बदल होणार असून पक्षात नव्याने आलेल्याना शहर कार्यकारणीत संधी दिली जाणार असल्याचेही खा. राऊत यांनी म्हटले आहे.
मालवण शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय जाहीर केला. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी पक्षांतर्गत बंडाळीमुळे श्री. कांदळगावकर यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसल्याची शहरात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी दुपारी महेश कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, किरण वाळके, महेश जावकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नरेश हुले, भाई कासवकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, पूजा तोंडवळकर आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मागील ५ वर्षात मालवण शहराला नवीन आकार आणि नवीन रूप देण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. महेश आणि त्याचे कुटुंबीय राजकारणात अद्याप रंगलेले नाही. पण समाजकारणात क्रमांक एकने उत्तीर्ण झाले आहे. महेश आणि त्यांच्या कुटुंबियांची शिवसेनेला खूप गरज आहे. म्हणूनच मी आणि वैभव नाईक कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या भेटीला आलो आहे. मी, वैभव नाईक आणि संपूर्ण शिवसेना महेशच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले.
मालवण शहर शिवसेनेत लवकरच फेरबदल करण्यात येणार आहेत. लवकरच एक बैठक घेऊन काही मतभेद असतील तर त्याच्यावर नक्की विचार करू. परंतु, कोणी पक्ष संघटना खिळखिळीत करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. महेश सारखी चांगली माणसे ही शिवसेनेची गरज आहे. आणि ती सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. नवीन आलेल्यांचा संघटनेत समावेश केला जाणार आहे.१५ दिवसात संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नवीन कार्यकारणी निवड केली जाईल, असे खा. विनायक राऊत म्हणाले.