एसटीचे पुढील चाक डोक्यावरून गेल्याने वासराचा जागीच मृत्यू 

मालवण शहरातील दुर्दैवी घटना ; मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर 

बस चालकाच्या दुर्लक्षाबरोबरच वासराच्या अज्ञात मालकाविरोधात प्राणी प्रेमींकडून संताप

मालवण : गायीच्या वासराच्या डोकीवरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने त्या वासराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मालवण शहरातील पोस्ट ऑफीस समोर रस्त्यावर घडली. या घटनेने प्राणीप्रेमींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. एसटीच्या पुढील चाकाखाली वासरू सापडल्याने एसटी चालकाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुर्घटनेनंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मृत वासराची विल्हेवाट लावली. मात्र या घटनेतही वासराचा मालक समोर आला नव्हता. त्याच्या बद्दल देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, वासराच्या मृत्यूनंतर शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मालवण शहरात शनिवारी सकाळी ग्रामीण भागातील प्रवासी घेऊन येणाऱ्या एका एसटी बसच्या पुढील चाकाखाली एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला. काही क्षणात घटनेची माहिती मिळताच प्राणिप्रेमी जमा झाले होते. प्रथमदर्शनी चालकाच्या चुकीमुळे वासराचा मृत्यू झाल्याचे दिसून येत होते. मात्र वासराचा अगर गाईचा मालकच समोर आला नसल्याने एसटी चालकाने काही काळ थांबून गाडी एसटी बसस्थानकात मार्गस्थ केली.

मालवण नगरपालिकेच्यावतीने दोन वेळा मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती, यामध्ये अनेक जनावरे पकडण्यात आली होती. त्यांच्या मालकांनी दंडात्मक रक्कम भरल्यानंतर ती जनावरे सोडून देण्यात आली होती. नगरपालिकेच्यावतीने कायमस्वरूपी जनावरे पकडण्यासाठी एक एजन्सीही निश्चीत करण्यात आलेली आहे. पालिकेने तात्पुरत्या स्वरूपाचा कोंडवाडाही निर्माण केलेला आहे. असे असताना सध्या शहरात वाढत चाललेल्या घटनांमुळे पुन्हा एकदा मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम हाती घेण्यात येणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिल्पा खोत यांचा सातत्याने पुढाकार

शहरातील मोकाट जनावरांना अपघात झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी जखमी बैलाला, गवंडीवाडा याठिकाणी सापडून आलेल्या गाय-वासरू यांना त्यांचा मालक मिळत नसल्याने स्वखर्चातून गाय वासरू गोशाळा खांबळे याठिकाणी पाठविले होते. त्याठिकाणी सध्या जखमी बैलावर सातत्याने उपचार सुरू आहेत. तर नुकतेच जन्मलेले वासरू आणि गाय यांनाही चांगल्याप्रकारे चारा आणि खाद्य मिळाले आहे. यामुळे शिल्पा खोत यांच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच शहरातील बजरंग दलाचेही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शहरातील गायींच्या रक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे दिसून आलेले आहे.

error: Content is protected !!