हर घर तिरंगा अभियानांतर्गत मालवणात भव्य तिरंगा बाईक रॅली

मालवण नगरपरिषदेचे आयोजन ; नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अधिकारी – कर्मचारी वं नागरिकांचा लक्षणीय सहभाग

मालवण : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालवण नगरपरिषदेतर्फे विविध देशभक्तीपर व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत मालवण शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीचा शुभारंभ मालवण नगरपरिषद कार्यालयापासून झाला. तिरंगा ध्वजांनी सजलेल्या दुचाकींवरून सहभागी नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत हुतात्मा रेगे स्मारकापर्यंत रॅली काढली. या रॅलीमध्ये नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला.

error: Content is protected !!