कणकवली पोलिसांच्या “त्या” नोटीसीला नारायण राणेंकडून उत्तर !
सिंधुदुर्गः शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयीत असलेल्या आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावल्याने राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. या नोटीसीनंतरही राणे कोर्टात हजर झालेले नाहीत. मात्र राणेंकडून या नोटीसीला उत्तर देण्यात आले आहे. “मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही. कामामुळे आणखी दोन ते तीन दिवस व्यस्त राहणार आहे. व्हिसीद्वारे तुम्ही माझा जबाब घेऊ शकता, असे लेखी पत्र राणे यांनी दिले आहे. त्यामुळे आता यावर पोलीस काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होतं. त्यामुळे याबाबत पोलिसांनी राणेंना नोटीस बजावत दुपारी ३ वाजता कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे कळवले होते. त्यांच्याकडून नितेश राणेंच्या ठावठिकाण्याची माहिती घेण्यात येणार होती. त्यासाठी राणेंच्या कणकवली मधील घरावर ही नोटीस चिकटवण्यात आली. मात्र, त्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्याकडून दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्र देऊन या नोटीसचे उत्तर दिले आहे. राणे आपल्या पत्रात म्हणतात की, मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही. कामामुळे आणखी दोन ते तीन दिवस व्यस्त राहणार आहे. व्हिसीद्वारे तुम्ही माझा जबाब घेऊ शकता, असे आवाहनही राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता यावर पोलीस काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.