
SSC २०१६-१७ बॅचचा कौतुकास्पद उपक्रम; IBT लॅबसाठी ४० हजारांचा धनादेश सुपूर्द
कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या SSC २०१६-१७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेली कृतज्ञता जपत शाळेच्या विकासासाठी ४० हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीचा धनादेश प्रशालेकडे सुपूर्द करण्यात आला.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने IBT (Introduction to Basic Technology) लॅबसाठी ही देणगी देण्यात आली आहे. ज्या शाळेने शिक्षणासोबतच संस्कार देऊन विद्यार्थ्यांना घडविले, त्या शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत केलेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रशालेच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी शक्य ते योगदान देण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकवृंदाने जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गिरीश घाडीगावकर आणि उद्धव पारकर यांनी मनोगत व्यक्त करत शाळेशी असलेल्या जुन्या आठवणी व ऋणानुबंधांना उजाळा दिला.
यावेळी SSC २०१६-१७ बॅचचे माजी विद्यार्थी उद्धव पारकर, समीर गुरव, गिरीश घाडीगावकर, सोनाली सापळे आणि गौरी घाडीगावकर उपस्थित होते. तसेच शालेय समितीचे चेअरमन डॉ. सुहास पावसकर, शालेय समिती सदस्य बाबासाहेब वर्देकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नवाळे मॅडम, सुमन तांबे मॅडम, डोंबाळे सर, हरकुळकर मॅडम, सुप्रिया तांबे मॅडम, स्वप्नील वर्देकर सर, उज्वला पावसकर यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी दिलेल्या या योगदानाबद्दल प्रशालेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. ‘ज्या शाळेने घडविले, त्या शाळेच्या विकासासाठी काहीतरी देणे हीच खरी कृतज्ञता’, असा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.






Subscribe to my channel






