ओंकार आपला आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही आपलीच…!

जागतिक प्राणी दिनानिमित्त भोसले नॉलेज सिटीचा हृदयस्पर्शी संदेश

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन. या निमित्ताने भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी (BKC) यांच्या वतीने प्राणी संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाबाबत संवेदनशील जनजागृती संदेश देण्यात आला. “प्रत्येक प्राणी हा या पृथ्वीचा एक मौल्यवान जीव आहे… ओंकार आपला आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे…” या संदेशातून मुक्या जीवांप्रती माणसाने जपायची संवेदनशीलता अधोरेखित करण्यात आली.

या संदेशाला सध्या सावंतवाडी-दोडामार्ग परिसरात चर्चेत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीच्या प्रश्नाची पार्श्वभूमी लाभली आहे. ओंकारकडून मानवी वस्तीत, अगदी नागरिकांच्या अंगणापर्यंत येण्याच्या घटना घडत असून, त्यामुळे काही नागरिकांना त्रास आणि भीतीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, ओंकारच्या परिस्थितीबाबत संवेदना व्यक्त करत त्याच्या जीविताचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण व्हावे, अशी मागणीही वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पेटती मशाल फेकल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर राज्यभरातील प्राणी व वन्यजीवप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. ओंकारला हुसकावून लावण्याऐवजी त्याच्या हालचालींचा अभ्यास करून, मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि त्याचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे.

भोसले नॉलेज सिटीने शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक, पर्यावरणीय आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्यावर नेहमीच भर दिला आहे. जागतिक प्राणी दिनानिमित्त दिलेला “ओंकार आपला आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही आपलीच!” हा संदेश केवळ एका हत्तीपुरता मर्यादित नसून, मानवाने निसर्गातील प्रत्येक जीवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन करणारा ठरत आहे.

error: Content is protected !!