पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी विविध योजना कार्यान्वित
अंमलबजावणीतील अडचणींबाबत पुढील दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
ओरोस येथील बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन
ओरोस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी विविध योजना कार्यान्वित झाल्या असून त्यांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. पुढील सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये आपण स्वतः येथील जिल्हाधिकारी आणि त्यांच्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन यामधील अडचणी दूर करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शनिवारी ओरोस येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना दिली.
भाजपच्या वतीने देशभरातील १४४ लोकसभा मतदार संघात ‘लोकसभा प्रवास योजना’ अभियान राबवित आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ स्वबळावर जिंकण्याची तयारी भाजपाने या अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तीन दिवसांच्या लोकसभा क्षेत्र दौऱ्यावर आलेले आहेत.
त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा शनिवारी ओरोस येथील इच्छापूर्ती सभागृह येथे पार पडला. यावेळी ना. अजय कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थींनी आपल्याला मिळत असलेल्या योजनेतून आपल्या जीवनामध्ये कोणता सकारात्मक फरक पडला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचत असल्याने आपणास खूप फायदा झाला असे नमूद केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करणारी अनेक अभिनंदन पत्रे देखील मंत्री महोदयांकडे सुपूर्द केली. या मेळाव्यामध्ये या अभियानाचे लोकसभा क्षेत्र संयोजक अतुल काळसेकर यांनी सर्व योजनांचा आढावा मांडला.
यावेळी व्यासपीठावर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, सरचिटणीस प्रभाकर सावंत, अशोक सावंत, संध्या तेरसे, भाई सावंत, रणजित देसाई, संजु परब, धोंडी चिंदरकर, विनायक राणे, दादा साईल, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, महेश मांजरेकर, देवेन सामंत आदी उपस्थित होते
प्रास्ताविक आनंद उर्फ भाई सावंत यांनी केले.