सिंधुदुर्गनगरी (जिमाका वृत्तसेवा) सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ( १७ सप्टेंबर २०२५)ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
या पंधरवड्याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांची असणार आहे. हा समारोह जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडणार आहे. या समारोहामध्ये सर्वांसाठी घरे, जातीचे दाखले व वय, आधीवास, राष्ट्रीय प्रमाणपत्र तसेच आधार किटचे लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे , मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे असणार असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.