गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा

बंदरे व मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे मानले आभार

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश श्री.भूषण गवई आणि न्यायमूर्ती श्री.के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अशा दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जेट्टी प्रकल्पाविरोधातील तिन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे या जेट्टी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून या प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक व जलद सुविधा मिळणार आहेत. 

हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर गेटवे परिसरातील जलवाहतूक क्षेत्र अधिक बळकट होऊन सागरी प्रवासाला चालना मिळेल. तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा मिळून सागरी पर्यटनात वाढ होईल. शिवाय मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांना प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून याची माहिती देऊन सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!