विशाल परब यांनी पेटवली ‘पाणीदार’ चळवळीची मशाल; वेंगुर्ल्यात लोकसहभागातून उभा राहिला वनराई बंधारा

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाला, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला : संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसानिमित्त वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प करत विशाल परब यांच्या पुढाकारातून मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत गावागावांत वनराई बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे आणि भूजलपातळी टिकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांनी सकाळपासून श्रमदान करत वनराई बंधारा उभारला. महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने लोकसहभागातून जलसंधारणाची प्रभावी चळवळ उभी राहत असल्याचे चित्र दिसून आले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढण्यास तसेच विहिरींची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना विशाल परब यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, “ही केवळ बंधारा उभारण्याची गोष्ट नाही, तर गावागावांतून उभी राहणारी मोठी जलचळवळ आहे,” असे सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठे कार्यक्रम न करता प्रशासनाच्या सहकार्याने गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. एखाद्या बुकेऐवजी सिमेंटची गोणी स्वीकारली किंवा पोस्टर लावण्याऐवजी पाण्याचा साठा निर्माण केला, तर त्याचा फायदा भविष्यातील पिढ्यांना होईल. आजची गरज ओळखून जलसंधारणाकडे वळणे आवश्यक आहे, असेही विशाल परब यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील विविध भागांत वनराई बंधारे उभारण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात या उपक्रमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांकडून या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘पाणीदार’ चळवळीला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न ऊर्फ बाळू देसाई, नगरसेवक सचिन शेटये, भाजपचे मातोंड गावातील पदाधिकारी ताता मेस्त्री, अनिल परब, माजी उपसरपंच आनंद परब, दत्ता धुरी, नंदकिशोर परब, विकास परब, बबीता कोंडूसकर, रवी मातोंडकर, आनंद मातोंडकर, महेश मातोंडकर, रूपक मातोंडकर, सत्यवान परब, प्रवीण गुरव, प्राची गुरव, प्रभावती घाडी, संता परब यांच्यासह महिला क्रांती ग्रामसंघ मातोंड, रवळनाथ शेतकरी गट आणि मातोंड गावठणवाडी शेतकरी गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!